बिस्किटचा मुदतबाह्य साठा जप्त

By admin | Published: August 25, 2015 03:30 AM2015-08-25T03:30:55+5:302015-08-25T03:30:55+5:30

बिस्किट खाताय सावधान! एका नामांकित कंपनीचा लाखो रुपये किमतीचे मुदतबाह्य बिस्किट आणि अन्नपदार्थांचा

Biscuit deadline seized | बिस्किटचा मुदतबाह्य साठा जप्त

बिस्किटचा मुदतबाह्य साठा जप्त

Next

नागपूर : बिस्किट खाताय सावधान! एका नामांकित कंपनीचा लाखो रुपये किमतीचे मुदतबाह्य बिस्किट आणि अन्नपदार्थांचा साठा अन्न व प्रशासन विभागाने (एफडीए) सोमवारी धाड टाकून जप्त केला. या धाडीमुळे अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, या कंपनीची मुदतबाह्य बिस्किटे बाजारात विक्रीस तर नाही ना, याचा शोध आता एफडीएचे अधिकारी घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी ८ वाजता शास्त्रीनगर भागातील योगेश ग्वालानी याच्या घरी धाड टाकली. या ठिकाणी एका कंपनीचे नमकीन, बिस्किट, केक, व्हेपर्स इत्यादी विविध बॅ्रण्डचा मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा विक्रीसाठी साठविलेला आढळून आला. या मालाची किंमत जवळपास १२ लाख रुपये असून तो जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) नरसिंह वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे, संजय बोयेवार, अखिलेश राऊत आणि प्रवीण उमप यांनी केली.
डम्पिंग यार्डमध्ये नष्ट
हा माल जनतेच्या आरोग्यास घातक असल्याने आणि बाजारात पुनर्विक्री होऊ नये तसेच सेवन केल्यास जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याच्या दृष्टीने हा साठा चार ट्रकमध्ये भरून भांडेवाडी, डम्पिंग यार्डमध्ये नेऊन नष्ट करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, योगेश ग्वालानी हे मुदतबाह्य असलेल्या अन्नपदार्थांच्या पॅकेटवरील उत्पादन तिथी थिनर या रसायनाने पुसून नवीन उत्पादन तिथी नमूद करून बाजारात पुनर्विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. धाडीदरम्यान थिनर, इंक आणि दोन खोल्यांमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आढळला. धाड टाकली त्यावेळी पॅकेटवर अद्ययावत उत्पादन तिथी नमूद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा क्रश करून त्याची पावडर करण्याचे अधिकार कंपनीच्या अधिकृत ‘सी अ‍ॅण्ड एफ’ला आहेत. ही पावडर अखाद्य असते, पण पशुखाद्य म्हणून विक्री करता येते. यासाठी कंपनी अधिकृत एजंटांची नियुक्ती करते. कंपनीचा अशा कोणत्याही प्रकारचा परवाना योगेश ग्वालानीकडे नव्हता. त्यानंतरही तो जनतेच्या आरोग्याला घातक असलेला माल बाजारात विक्री करण्याचे कृत्य करीत होता. योगेशविरुद्ध पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविला असून, याप्रकरणी अधिकारी चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Biscuit deadline seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.