जबलपूरच्या बिशपला नागपूर विमानतळावर घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 07:49 PM2022-09-12T19:49:37+5:302022-09-12T19:51:24+5:30
Nagpur News कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात द चर्च ऑफ नॉर्थ इंडिया जबलपूर डायओसेस जबलपूर येथील बिशप प्रेमचंद्र सिंगला सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.
नागपूर : कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात द चर्च ऑफ नॉर्थ इंडिया जबलपूर डायओसेस जबलपूर येथील बिशप प्रेमचंद्र सिंगला सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. मध्य प्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) ही कारवाई केली. जर्मनीहून परतताना बिशपला नागपूर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.
बिशप प्रेमचंद्र सिंह मूळचा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी आहे. ट्रस्ट अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शाळांचा पैसा धार्मिक कार्यात वापरल्याचा बिशपवर आरोप आहे. यापूर्वी ईओडब्ल्यू टीमने टाकलेल्या छाप्यात सिंगच्या जबलपूर येथील घरातून १ कोटी ६० लाख रुपये रोख, तसेच परकीय चलन जप्त करण्यात आले होते. ज्यावेळी छापा टाकण्यात आला तेव्हा बिशप जर्मनीत असल्याने चौकशी करता आली नव्हती. चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ट्रस्ट असोसिएशनने त्याच्याविरोधात ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
बिशपच्या प्रत्येक हालचालीवर मध्य प्रदेश ईओडब्लूची नजर होती. जर्मनीहून दिल्लीत परतल्यावर बंगळुरूमार्गे नागपुरात पोहोचल्यावर विमानतळावर सीआयएसएफच्या मदतीने बिशपला ताब्यात घेण्यात आले.
कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप
बिशपच्या घरी टाकलेल्या छाप्यात १७ मालमत्तांची कागदपत्रे आणि कुटुंबाच्या ४८ बँक खात्यांची कागदपत्रेही सापडली होती. इओडब्ल्यूने दिलेल्या तपशिलांवरून असे दिसून आले की बिशपकडे ९ वाहने, १७ मालमत्ता आणि संस्था आणि नातेवाइकांची ४८ बँक खाती आहेत. २००४-०५ ते २०११-१२ दरम्यान सोसायटीच्या विविध संस्थांतर्फे विद्यार्थ्यांची फी म्हणून जमा केलेले २.७० कोटी रुपये कथितरीत्या धार्मिक संस्थांमध्ये हस्तांतरित केले गेले, त्याचा गैरवापर केला गेला आणि बिशपने वैयक्तिक गरजांसाठी खर्च केला, असा आरोप आहे.