बिटकॉईन मायनिंग हे चलन आभासी, पण विजेबाबत महाअधाशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 07:00 AM2021-11-26T07:00:00+5:302021-11-26T07:00:01+5:30

Nagpur News संगणकांद्वारे ‘बिटकाॅईन’ शाेधण्यासाठी दिवसाला १२१.३६ टेरावॉट-अवर्स वीज लागते. एक टेरावॉट म्हणजे एक मिलियन किंवा दहा लाख मेगावॅट.

Bitcoin mining is a virtual currency, but it is very expensive about electricity! | बिटकॉईन मायनिंग हे चलन आभासी, पण विजेबाबत महाअधाशी!

बिटकॉईन मायनिंग हे चलन आभासी, पण विजेबाबत महाअधाशी!

Next

निशांत वानखेडे

नागपूर : केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईन वगैरे आभासी चलनावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात असताना केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, या चलनाचा संबंध केवळ चलन विनिमय किंवा अर्थव्यवस्थेशी नसून, पर्यावरणाशीही आहे. त्याच्या मायनिंगसाठी प्रचंड वीज वापरली जाते. जगभरातील सगळ्या सोशल मीडियाच्या वापरासाठी जितकी वीज लागते त्याहून अधिक वापर संगणकीय अल्गोरिदमच्या रूपाने हे चलन मिळविण्यासाठी होतो. कारण, प्रचंड क्षमतेचे हार्डवेअर, सर्व्हर, कुलिंग सिस्टीम त्यासाठी लागते.

‘क्रिप्टाेकरन्सी’ व्यवहारासंदर्भात संसद अधिवेशनात नवा कायदा आणण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर देशभर हे आभासी चलन चर्चेत आहे. यादरम्यान, केंब्रिज विद्यापीठाचा हा बिटकॉईन मायनिंगसाठी लागणाऱ्या विजेविषयीचा अभ्यास लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. संगणकांद्वारे ‘बिटकाॅईन’ शाेधण्यासाठी दिवसाला १२१.३६ टेरावॉट-अवर्स वीज लागते. एक टेरावॉट म्हणजे एक मिलियन किंवा दहा लाख मेगावॅट. यावरून चलनासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेची नासाडी लक्षात यावी. विशेषत: संपूर्ण जग हवामान बदल व तापमानवाढ समस्येचा सामना करत असताना, वीज वापराचा मुद्दा चर्चेत असताना ही नासाडी पृथ्वीचे तापमान आणखी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

साधारणत: मागील दशकाच्या सुरुवातीपासून क्रिप्टाेकरन्सीची संकल्पना पुढे आली. २०१६मध्ये एका बिटकाॅईनची किंमत ५०० अमेरिकन डाॅलर हाेती. ती आता ५०,००० डाॅलरवर पाेहोचली आहे. या आभासी पैशाचे व्यवहार आता अगदी छोट्या शहरांपर्यंत पोहोचले आहेत. तरूण पिढीत या चलनाची क्रेझ आहे. त्यासाठी स्पर्धाही वाढली असून, अनेक नव्या कंपन्या मायनिंगमध्ये उतरल्या आहेत. या कंपन्यांना प्रचंड वीज व त्यासाठी कोळसा व पाणी लागते. त्यातून प्रचंड कार्बनडायऑक्साईडसारख्या घातक ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन हाेते. त्याचा थेट दुष्परिणाम पृथ्वीभोवतीच्या ओझोन थरावर होत असून, तापमानवाढीला नवे कारण मिळाले आहे.

केंब्रिज विद्यापीठाचे निष्कर्ष

*बिटकाॅईनसारख्या क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार करणारी कंपनी वर्षभरात साधारणत: ९१ टेरावॉट अवर्स वीज वापरते. ५.५ दशलक्ष लाेकसंख्येच्या फिनलॅन्डला वर्षभरात लागणाऱ्या विजेपेक्षा अधिक किंवा अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्याच्या गरजेइतकी ती आहे.

*जगभरात वापरल्या जाणाऱ्या विजेच्या तुलनेत बिटकाॅईन मायनिंगसाठी लागणारी वीज सध्या ०.५ टक्केच असली, तरी गेल्या पाच वर्षांत तिचा वापर दहापटीने वाढला आहे.

*बिटकाॅईन मायनिंगसाठी दिवसाला लागणारी १२१.३६ टेरावॉट-अवर्स वीज गुगल, फेसबुक, मायक्राेसाॅफ्ट, ॲपल, नेटफ्लिक्स या माेठ्या कंपन्यांना लागणाऱ्या एकूण विजेपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण गुगलच्या जगभरातील वार्षिक वापराच्या सातपट अधिक आहे.

*एक बिटकाॅईन शाेधण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेतून एका घरासाठी १३ वर्ष वीजपुरवठा शक्य आहे.

*सध्या बिटकाॅईन मायनिंग उद्याेगात केवळ ३९ टक्के अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला जातो.

- बिटकाॅईन मायनिंग कंपनीमध्ये १३९ मिलियन गॅलाेन पाण्याची गरज असते. त्यातून प्रचंड उष्णतेचे पाणी बाहेर पडते, जलचर प्राण्यांना घातक ठरते. शिवाय प्रचंड उष्णता जैवविविधतेसाठी धाेकादायक ठरते.

असे होते बिटकॉईन मायनिंग

गणिती समिकरणे व संगणकीय अल्गोरिदम हा बिटकॉईन मायनिंगचा आधार आहे. विविध टप्प्यांवर मॅथेमॅटिकल व कॉम्प्युटिंग इक्वेशन्सद्वारे ठराविक रक्कम गुंतवून क्रिप्टोच्या एका नाण्याचा काही भाग विकत घेता येतो. त्यानंतर पुढे संगणकीय व्यवहार सुरू होतात. त्यासाठी अधिक क्षमतेचे हार्डवेअर व सर्व्हर लागतात. त्यावर मायनर्स (संगणकावरील खाण कामगार) दिवस-रात्र बिटकाॅईन शाेधण्याचे काम करत असतात. बिटकाॅईन शाेधण्यासाठी काही मिनिटांपासून अनेक तासही लागू शकतात. संगणकाचे तापमान वाढू नये म्हणून भरपूर क्षमतेच्या वातानुकूलित यंत्रांची गरज असते.

Web Title: Bitcoin mining is a virtual currency, but it is very expensive about electricity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.