नागपुरात रुग्णाने घेतला पोलिसाला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 22:19 IST2019-07-19T22:18:30+5:302019-07-19T22:19:41+5:30
डॉक्टरला शिवीगाळ करणाऱ्या रुग्णाला समजावण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला रुग्णाने मारहाण करून चावा घेतला. पकडल्यानंतर या रुग्णाने सुरक्षारक्षकालाही चावा घेऊन पळ काढला. ही घटना शुक्रवारी मेडिकल रुग्णालयांतर्गत येणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घडली.

नागपुरात रुग्णाने घेतला पोलिसाला चावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: डॉक्टरला शिवीगाळ करणाऱ्या रुग्णाला समजावण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला रुग्णाने मारहाण करून चावा घेतला. पकडल्यानंतर या रुग्णाने सुरक्षारक्षकालाही चावा घेऊन पळ काढला. ही घटना शुक्रवारी मेडिकल रुग्णालयांतर्गत येणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घडली.
प्राप्त माहितीनुसार, आज शुक्रवारी सकाळी एक रुग्ण आपल्या आईसोबत सुपर रुग्णालयातील वॉर्ड क्र. ४३ मध्ये तपासणीसाठी आला. त्याची आई बाजूलाच बसली होती. मात्र, हा रुग्ण वारंवार डॉक्टरांकडे जाऊन डिस्टर्ब करीत होता. तो डॉक्टरांवरही भडकला. डॉक्टरांनी त्याला बसायला सांगितले. मात्र, तो ऐकतच नव्हता. त्याने डॉक्टरला धमकीही दिली होती. काय झाले अशी विचारणा करीत बाजूला असलेले इतर रुग्ण व नातेवाईकांनीही गर्दी केली. त्याच वेळी एक पोलीस कैद्याला घेऊन तपासणीसाठी आला होता. वादविवाद पाहून पोलीस मध्यस्थी करायला गेला. मात्र, या रुग्णाने मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की करीत मारहाण केली व चावाही घेतला. डॉक्टरांनी ताबडतोब ओपीडीत कार्यरत सुरक्षारक्षकांना फोन करून वर बोलावले. (त्याच वेळी डॉक्टरने १०० क्रमांकावरही फोन केला) हिमांशु कठाळे (२२) हा सुरक्षारक्षक इतर चार सहकाऱ्यांना घेऊन वर वॉर्ड ४३ मध्ये पोहोचला. चावा घेणाऱ्या रुग्णाला ताब्यात घेऊन खाली आणले. मात्र, झटका देत रुग्णाने कठाळे यांनाही चावा घेतला आणि तुकडोजी कॅन्सर रुग्णालयाच्या दिशेने काही दूर पळून गेला. सुरक्षारक्षकांनी मागे धावून रुग्णाला पकडले. दरम्यान, १०० क्रमांकावर फोन आल्यानंतर अजनी पोलीस सुपरमध्ये पोहोचले आणि सुरक्षारक्षकांनी रुग्णाला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा काही प्रमाणात मानसिक रुग्ण असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.