नखे कुरतडताय की पोटाचे आजार वाढवताय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2023 08:25 PM2023-02-24T20:25:45+5:302023-02-24T20:26:09+5:30

Nagpur News एका अभ्यासानुसार, जे लोक सतत नखं खातात किंवा कुरतडतात ते अधिक तणावात असतात. ते सतत स्वत:शी संबंधित कुठलातरी विचार करीत असतात.

Biting nails or increasing stomach ailments? | नखे कुरतडताय की पोटाचे आजार वाढवताय ?

नखे कुरतडताय की पोटाचे आजार वाढवताय ?

googlenewsNext

 

नागपूरः एका अभ्यासानुसार, जे लोक सतत नखं खातात किंवा कुरतडतात ते अधिक तणावात असतात. ते सतत स्वत:शी संबंधित कुठलातरी विचार करीत असतात. अनेक मुलांना नख कुरतडण्याची सवय असते. परीक्षा काळात हे प्रमाण जास्त असते. मात्र, असे केल्याने पोटाचे, त्वचेचे जबड्याचे आजार होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे पालकांनी मुलांना जडलेली ही सवय बंद करण्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.

नखं का कुरतडली जातात ?

- अनेकजण विचारात मग्न असतात. एखाद्या गोष्टीचा ताण आला किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास नखं कुरतडली जातात. विचारमग्न व्यक्तीला दुसरी कुठली वस्तू उपलब्ध नसते. त्यामुळे तो सहज हाताची बोटे तोंडात टाकून नखं कुरतडतो. शिवाय नखं कुरतडल्याने इजा होत नाही, त्यामुळे ही सवय जडते.

 

सवय सोडण्यासाठी हे करा...

- ही सवय मोडायची असेल तर जेव्हा केव्हा तुम्हाला नखं कुरतडण्याची इच्छा होईल तेव्हा लगेच दुसरीकडे लक्ष केंद्रित करा.

- वाटलं तर लगेच एखादं फळ खाण्यासाठी घ्या.

- तोंडात सतत च्युईंगम, दाणेफुटाणे, लॉलीपॉप तसेच गाजरसारखे पदार्थ तोंडात ठेवा.

- जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपसूकच कुरतडण्याची सवय पुन्हा सुरू होते. त्यामुळे नखे वाढूच देऊ नका.

असे आहेत दुष्परिणाम

- पोटविकार तज्ज्ञ डॉ. अभिजित देशमुख यांच्यानुसार नखं स्वच्छ न ठेवल्यास त्यात साल्मोनेला आणि ई कोलाईसारखे विषाणू जमा होतात. सतत नखं चावण्याच्या सवयीमुळे तोंडावाटे हे विषाणू शरीरात जाऊन बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे पोटात संसर्गाचा धोका वाढतो.

- वारंवार नखं चावल्याने पेरोनिशिया नावाचं स्कीन इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. यामध्ये नखाच्या आजूबाजूच्या त्वचेत विषाणू प्रवेश करतात त्यामुळे बोटांवर लालसरपणा आणि सूज निर्माण होते.

- नखे चावल्याने त्यातील घाण दातांवर जमा होते आणि दात कमजोर होतात.

नखं कुरतडणे ही एक वाईट सवय आहे. कारण, नखं चावता चावताना त्यातील बॅक्टेरिया आतड्यांमध्ये जातात आणि यामुळे कॅन्सरसारखा रोगही होऊ शकतो. नखं खाण्याने शरीरात ह्युमन पेपिलोमा नामक व्हायरस पसरतो. ज्यामुळे हात, ओठ आणि तोंडात मस होऊ शकतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही सवय वेळेतच मोडलेली बरी.

- डॉ. अभिजित देशमुख, पोटविकार तज्ज्ञ

काही लोक खूप संवेदनशील असतात. चिंता वाढली की प्रत्येकाच्या बॉडीची एक वेगवेगळी रिॲक्शन असते. काही लोक फेरी मारतात. काही लोक टेबल वाजवतात. काही डोक्याला पेन घासतात, केस ओढतात. पाय हलवितात. तसेच काही लोक नखं कुरतडतात. नखं कुरतडताना जेव्हा मांस कापलं जातं तेव्हा त्यांना ‘रिलिज सेन्सेशन’ येते. सुखावल्यासारखे वाटते. नंतर ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावीशी वाटते व शरीराला त्याची सवय होते.

मेंदू एका इंजिनसारखा आहे. तो एका मर्यादेत विचार करतो. अतिशय जास्त विचार करायला लागले की असे होते.

- डॉ. सुशील गावंडे, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Biting nails or increasing stomach ailments?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य