विषारी सापाचा चिमुकल्याला दंश, सर्पमित्रांची तत्परता; उपचार सुरू
By नरेश डोंगरे | Published: March 2, 2024 02:42 AM2024-03-02T02:42:12+5:302024-03-02T02:42:44+5:30
ही घटना रामटेक तालुक्यातील नवीन चिचडा गावात सायंकाळी घडली.
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सायंकाळी घराजवळ खेळत असलेल्या राज यादव नामक चार वर्षीय चिमुकल्याला फुरसे (वायपर) जातीच्या विषारी सापाने कडाडून चावा घेतला. ही घटना रामटेक तालुक्यातील नवीन चिचडा गावात गुरुवारी सायंकाळी घडली.
चिमुकला राज त्याच्या घराजवळ गुरुवारी सायंकाळी खेळत असताना ७ च्या सुमारास सापाने त्याच्या पायाला चावा घेतला. ही माहिती राजने त्याच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर हा साप पकडून एका प्लास्टीकच्या बाटलीत बंद करण्यात आला.
दरम्यान, चिमुकल्याला सापाने चावा घेतल्याची माहिती कळताच गावात एकच खळबळ निर्माण झाली. ही माहिती सर्पमित्र राहूल कोठेकर आणि अजय मेहरकुळे यांना कळली. त्यांनी तातडीने राजला रामटेकच्या रुग्णालयात पोहचवून चावा घेणारा साप विषारी असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर प्रथमोपचार करून राजला सर्पमित्र आणि कुटुंबियांनी तात्काळ नागपूरच्या मेेडिकलमध्ये हलविले.
सर्पमित्रांनी बालकाच्या मदतीसाठी नागपूर शहरातील वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे सर्पमित्र नितिश भांदककर, गाैरांगवाईकर, आकाश कशेट्टीवार यांना बोलवून घेतले. त्यांनी मेडिकलमध्ये वार्ड नंबर ५० मध्ये दाखल असलेल्या राज यादववर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क करून कुटुंबियांचेही समुपदेशन केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्याने चिमुकल्या राजची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते.