निवडणुकांमध्ये विदर्भवाद्यांना दारुण अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:05 AM2019-05-31T00:05:16+5:302019-05-31T00:06:23+5:30

लोकसभा निवडणुकांत विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येत विदर्भ राज्य निर्माण महामंच स्थापन केला. मात्र निकालात मंचच्या उमेदवारांचे कुठेच अस्तित्वही जाणवले नाही. सातही जागांवरील उमेदवारांची जमानत जप्त झाली. एकेकाळी ज्या भूमीत विदर्भाच्या नावावर उमेदवार विजयी झाले होते, तेथे विदर्भवाद्यांचा प्रभावच राहिला नसल्याचे चित्र निकालातून समोर आले.

Bitter unsuccess for Vidarbhawadi in the elections | निवडणुकांमध्ये विदर्भवाद्यांना दारुण अपयश

निवडणुकांमध्ये विदर्भवाद्यांना दारुण अपयश

Next
ठळक मुद्देसर्वच उमेदवारांची जमानत जप्त : विदर्भ राज्य निर्माण महामंचचा प्रभावच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांत विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येत विदर्भ राज्य निर्माण महामंच स्थापन केला. मात्र निकालात मंचच्या उमेदवारांचे कुठेच अस्तित्वही जाणवले नाही. सातही जागांवरील उमेदवारांची जमानत जप्त झाली. एकेकाळी ज्या भूमीत विदर्भाच्या नावावर उमेदवार विजयी झाले होते, तेथे विदर्भवाद्यांचा प्रभावच राहिला नसल्याचे चित्र निकालातून समोर आले.
महामंचमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी, आरपीआय खोब्रागडे, लोकजागर पार्टी, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष यासारख्या विदर्भवादी राजकीय संघटनांचा प्रामुख्याने समावेश होता. विदर्भ राज्य निर्माण महामंचने अगोदर विदर्भातील सर्वच दहाही जागा लढविण्याचे जाहीर केले होते. मात्र बुलडाणा, गडचिरोली व यवतमाळात मंचचे कुणी उमेदवारच नव्हते. इतर ठिकाणी उमेदवारांसाठी मंचच्या सर्व पक्षांनी ताकद झोकली होती. एकीकडे निवडणुकीत राष्ट्रवाद, विकास यांच्यासह विविध आरोप-प्रत्यारोप गाजत असताना मंचतर्फे विदर्भाच्या नावावरच प्रचार करण्यात आला. मात्र प्रचारातदेखील बहुतांश उमेदवारांचे अस्तित्वच जाणवले नव्हते.
सातही जागांवरील निकालात उमेदवारांची जमानत जप्त झाली. हा महामंच तयार करण्यात पुढाकार घेणाऱ्यांपैकी असलेले अ‍ॅड.सुरेश माने यांना नागपुरातून केवळ ०.२९ टक्के मतं मिळाली तर ज्ञानेश वाकुडकर यांच्या वाट्याला अवघी ०.११ टक्के मतं आली. चंद्रपूर येथील उमेदवार दशरथ मडावी यांना सर्वाधिक ०.२५ टक्के मतं मिळाली.
विदर्भाचा मुद्दाच पडला मागे
राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर विदर्भाच्या आंदोलनाला गती मिळाली होती. मात्र कालांतराने हे आंदोलन ‘सोशल मीडिया’वरच मर्यादित राहिले. काही शहरांत तर विदर्भवाद्यांच्या पाठीशी पुरेसे कार्यकर्तेदेखील नव्हते, असे चित्र होते. प्रचारादरम्यान मोठ्या राजकीय पक्षांतर्फे विदर्भाचा मुद्दा बाजूलाच ठेवण्यात आला. तर विदर्भ राज्य निर्माण महामंचच्या विदर्भवादी भूमिकेला जनतेने नाकारले, हेच आकडेवारीवरून दिसून येत आहे.
विदर्भवादी उमेदवारांचे ‘रिपोर्ट कार्ड’
लोकसभा मतदारसंघ                   उमेदवार              मतांची टक्केवारी
नागपूर                                  अ‍ॅड. सुरेश माने           ०.२९
वर्धा                                       ज्ञानेश वाकुडकर        ०.११
भंडारा-गोंदिया                    देवीदास लांजेवार           ०.१२
रामटेक                               चंद्रभान रामटेके             ०.१५
चंद्रपूर                                   दशरथ मडावी              ०.२५
अमरावती                              नरेंद्र कठाणे                ०.१५
अकोला                                 गजानन हरणे               ०.११

Web Title: Bitter unsuccess for Vidarbhawadi in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.