नागपुरात भाजप-आपचा जल्लोष, काँग्रेसच्या खेम्यात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 09:53 PM2022-03-10T21:53:44+5:302022-03-10T21:54:21+5:30

Nagpur News पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर नागपुरातील राजकीय वर्तुळात ‘कही खुशी, कही गम’ असे वातावरण होते.

BJP-AAP rally in Nagpur, peace in Congress camp | नागपुरात भाजप-आपचा जल्लोष, काँग्रेसच्या खेम्यात शांतता

नागपुरात भाजप-आपचा जल्लोष, काँग्रेसच्या खेम्यात शांतता

Next

नागपूर : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर नागपुरातील राजकीय वर्तुळात ‘कही खुशी, कही गम’ असे वातावरण होते. उत्तरप्रदेशसह उत्तराखंड, गोवा, मणिपूर येथे बाजी मारणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात विविध ठिकाणी जल्लोष केला, तर पंजाबमध्ये सत्ता काबीज करणाऱ्या आम आदमी पक्षालाही नवीन ऊर्जाच मिळाली व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. दुसरीकडे काँग्रेसच्या खेम्यात मात्र शांतता होती.

भाजपतर्फे धंतोली येथील कार्यालयासमोर दुपारी जल्लोष करण्यात आला. भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित आले होते. माजी महापौर दयाशंकर तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, संजय बंगाले, राम अंबुलकर, भाजयुमो अध्यक्ष पारेंद्र पटले, सुनील मित्रा, अश्विनी जिचकार, अर्चना देहनकर, चेतना टांक, संजय अवचट, किशोर वानखेडे, विनोद कन्हेरे, किशोर पालंदुरकर, देवेन दस्तुरे, चंदन गोस्वामी इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मिठाईचे वाटप करत फटाकेदेखील फोडण्यात आले. तसेच ‘बँड’च्या तालावर कार्यकर्ते अक्षरश: थिरकले.

महाराष्ट्रातदेखील प्रतिबिंब उमटणार

पूर्व नागपुरातील सतरंजीपुरा भागामध्ये आमदार कृष्णा खोपडे यांच्या निवासस्थानाजवळ आनंदोत्सवच साजरा करण्यात आला. या विजयाचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटतील. मुंबईसह, नागपूर व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील भाजप मुसंडी मारेल, असा दावा खोपडे यांनी केला.

‘आप’ची विजयी रॅली, कार्यकर्त्यांत नवा उत्साह

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मिळविलेल्या विजयानंतर पक्ष पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष केला. सकाळी निकालाचे कल सुरू झाल्यापासूनच उत्साह वाढला होता. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. त्यानंतर विजयी रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी ‘आप’चे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, नागपूर संयोजिका कविता सिंगल, नागपूर संघटनमंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकूलकर यांच्यासह राकेश उराडे, ॲड. राजेश भोयर, जितेंद्र मुटकुरे, प्रभात अग्रवाल, पियुष आकरे इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, येणाऱ्या मनपा निवडणुकीत आम्ही जोरदार टक्कर देऊ व चित्र बदलू, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

Web Title: BJP-AAP rally in Nagpur, peace in Congress camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.