भाजपकडून निवडणुकीच्या तयारीला वेग; पाच तास कार्यकारिणीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 07:00 AM2022-06-29T07:00:00+5:302022-06-29T07:00:11+5:30
Nagpur News शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यात तापलेले राजकीय वातावरण असताना, भाजपने वेट अँड वॉचची रणनीती अवलंबली आहे. घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून पक्षाने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
नागपूर : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यात तापलेले राजकीय वातावरण असताना, भाजपने वेट अँड वॉचची रणनीती अवलंबली आहे. घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून पक्षाने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी दक्षिण-पश्चिम नागपुरातील एका हॉटेलमध्ये माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
सुमारे पाच तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, विदर्भातील सर्व जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते. या बैठकीला केवळ निमंत्रित पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. व्यस्त वेळापत्रकामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. मुनगंटीवार यांनी महापालिका निवडणुकीपासून ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या तयारीचा आढावा घेतला. बूथ समित्यांचे सक्षमीकरण करण्याच्या गरजेवर भर देताना ते म्हणाले की, ज्या बुथवर पक्ष कमकुवत आहे, त्यांची यादी तयार करावी. अशा बुथमधील नागरिकांच्या घरोघरी पोहोचण्यासाठी स्वतंत्र चमू तयार करण्याची सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पक्षाच्या परिस्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.