'कलंक' टीकेवरून भाजप आक्रमक, नागपुरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन; ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 12:19 IST2023-07-11T12:13:58+5:302023-07-11T12:19:01+5:30
उद्धव ठाकरेंविरोधात भाजयुमो रस्त्यावर, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून नोंदवला निषेध

'कलंक' टीकेवरून भाजप आक्रमक, नागपुरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन; ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
नागपूर : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आले असता नागपुरात आयोजित सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचे पडसाद शहरात उमटत असून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवत आंदोलन करण्यात येत आहे.
भाजप चांगलीच आक्रमक झाले असून, नागपुरच्या व्हेरायटी चौकात भाजयुमोतर्फे उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार नारेबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. तसेच, प्रतिकात्मक पुतळा जाळून व अंत्ययात्रा काढून उद्धव ठाकरे हाय हाय म्हणत जोरदार निषेध नोंदवलाय. ही अंत्ययात्रा व्हेरायटी चौकातून राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत काढण्यात आली असून यात मोठ्या संख्येने भाजप समर्थक व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपूर येथे केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. ठाकरेंच्या वक्तव्यानंतर काहीवेळातच सोशल माध्यमांवर त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात उद्धव ठाकरे यांचे होर्डिंग्ज फाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ परिसरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लागलेले मोठे होर्डिंग्ज फाडत त्यांच्या चेहऱ्याच्या भागाला काळे फासण्यात आले. स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही व खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणीदेखील पदाधिकाऱ्यांनी केली.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी कृती : गडकरी
उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये ‘श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर ठाकरे यांनी जरूर चर्चा करावी. परंतु, अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, या शब्दांत नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध केला.