सरपंचपदामध्ये भाजपची सरशी, महाविकास आघाडीचाही जाेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 09:23 PM2022-12-20T21:23:16+5:302022-12-20T21:24:20+5:30
Nagpur News पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक नसल्याने आता सरपंचासह सदस्यांवर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांनी दावे - प्रतिदावे सुरू केले आहे. असे असले तरी विदर्भातील हा ग्राऊंड रिपाेर्ट ‘लाेकमत’ने अचूकपणे वेधला आहे.
नागपूर : विदर्भातील तब्बल १४४४ ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. थेट सरपंचपदासाठी ही निवडणूक असल्याने चांगलीच रंगत आली हाेती. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजप समर्थित पॅनलचे ५०३ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले. भाजप आणि शिंदे गट युतीचे ५४६ उमेदवार निवडून आले. त्यापेक्षा महाविकास आघाडी समर्थित गटाने दाेन पावले पुढे टाकली आहेत. महाविकास आघाडी समर्थित गटाचे ६८१ सरपंच निवडून आले. त्यात काँग्रेसचे ४७८, राष्ट्रवादीचे १६८ तर ठाकरे गटाच्या ३५ सरपंचांचा समावेश आहे. पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक नसल्याने आता सरपंचासह सदस्यांवर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांनी दावे - प्रतिदावे सुरू केले आहे. असे असले तरी विदर्भातील हा ग्राऊंड रिपाेर्ट ‘लाेकमत’ने अचूकपणे वेधला आहे.
‘लाेकमत’च्या स्थानिक प्रतिनिधींच्या रिपाेर्टनुसार, इतर पक्ष (प्रहार, शेतकरी संघटना, गाेंडवाना गणतंत्र पक्ष, आदिवासी विद्यार्थी संघ आणि अपक्ष) असे १७२ सरपंच निवडून आले. ती माेठ्या पक्षांसाठी चपराक मानली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस समर्थित ९५, प्रहार ३०, भाजप ५४, शिवसेना (उद्धव ठाकरे) १८, स्थानिक आघाडी ४० असे बलाबल राहिले. भंडारा जिल्ह्यातील ३०५ मध्ये काँग्रेस समर्थित ११०, भाजप १०४, राष्ट्रवादी ३५, शिवसेना शिंदे गट २०, इतर ३६ यांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ५८ पैकी काँग्रेस २२, भाजप २०, राष्ट्रवादी १, शिवसेना २, शेतकरी संघटना ७, गोंगपा १ आणि अपक्ष ६ सरपंच निवडून आले. गडचिराेली जिल्ह्यातील २७ पैकी काँग्रेसचे ६, भाजपचे ७, राकाँचे ५, बाळासाहेबांची शिवसेना २, शिवसेना (ठाकरे) १, आदिवासी विद्यार्थी संघ ३, अपक्ष ३ निवडून आले.
गाेंदिया जिल्ह्यातील ३४८ मध्ये बाळासाहेबांची शिवसेना ३, भाजप १४३, काँग्रेस ९३, राष्ट्रवादी काँग्रेस ६७, अपक्ष १५, चाबी संघटन ३१ सरपंच विजयी झाले. नागपूर जिल्ह्यात भाजप हा माेठा पक्ष ठरला. २३६ पैकी ९८ जागांवर भाजप समर्थित उमेदवार सरपंचपदी निवडून आले. काँग्रेस ८७, राष्ट्रवादी २४, शिवसेना (ठाकरे) ३, शिवसेना (शिंदे) ६, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष सरपंच १८ विजयी झाले.
यवतमाळ जिल्ह्यात भाजप २६, काँग्रेस २४, बाळासाहेबांची शिवसेना १३, राष्ट्रवादी काँग्रेस १२, शिवसेना (ठाकरे) ९, अपक्ष व इतर १६ असे १०० सरपंच विजयी झाले. वर्धा जिल्ह्यातील ११३ पैकी शिवसेना (ठाकरे गट) २, शिंदे गट १, भाजप ५१, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ४१ आणि १५ इतर पक्ष व अपक्ष विजयी झाले. यामध्ये ३ प्रहारच्याही सरपंचाचा समावेश आहे.