शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजपही गोंधळात, गाणारांना पाठिंबा की नवा उमेदवार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 08:00 AM2022-10-26T08:00:00+5:302022-10-26T08:00:07+5:30

Nagpur News नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक संघटना सक्रिय झाल्या आहेत. स्वत:चा उमेदवार लढवायचा की कुणाला पाठिंबा द्यायचा, हे काँग्रेसचे ठरलेले नाही. आता पाठोपाठ याच मुद्द्यावर भाजपमध्ये गोंधळ सुरू आहे.

BJP also in confusion, support for singers or new candidate? | शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजपही गोंधळात, गाणारांना पाठिंबा की नवा उमेदवार?

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजपही गोंधळात, गाणारांना पाठिंबा की नवा उमेदवार?

Next
ठळक मुद्देशिक्षक परिषदेचे समर्थनासाठी ३ ऑक्टोबरला बावनकुळेंना पत्र भाजप शिक्षक आघाडी दावा सोडेना

कमलेश वानखेडे

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक संघटना सक्रिय झाल्या आहेत. स्वत:चा उमेदवार लढवायचा की कुणाला पाठिंबा द्यायचा, हे काँग्रेसचे ठरलेले नाही. आता पाठोपाठ याच मुद्द्यावर भाजपमध्ये गोंधळ सुरू आहे. शिक्षक परिषदेने ३ ऑक्टोबर रोजी भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देत पाठिंबा देण्याची मागणी केली. मात्र, त्या पत्रावर अद्याप भाजपने कुठलाही निर्णय दिलेला नाही. यामुळे गाणार समर्थकांची चिंता वाढली आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकीत भाजपने शिक्षक परिषदेचे उमेदवार आ. नागो गाणार यांना पाठिंबा देत ही निवडणूक स्वत:च्या अंगावर घेत लढविली. यावेळी भाजपच्या समर्थनाची वाट न पाहता शिक्षक परिषदेने तिसऱ्यांदा आ. गाणार यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपकडून आज ना उद्या गाणार यांना समर्थन जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाठिंबा जाहीर होण्यास विलंब होताना दिसल्यामुळे शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी ३ ऑक्टोबर रोजी भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवत पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र, या पत्राला २२ दिवस होऊनही भाजपकडून सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत.

भाजपची शिक्षक आघाडी विभागात कार्यरत आहे. गेल्या सहा वर्षात शिक्षक आघाडीने काम केले आहे. त्यामुळे यावेळी ही जागा भाजप शिक्षक आघाडीला द्यावी, अशी मागणी शिक्षक आघाडीने पक्षाकडे केली आहे. भाजपने पक्षाच्या नावावर स्वत:ची शिक्षक आघाडी उभी केली आहे. भाजप शिक्षक आघाडीच्या महाराष्ट्र संयोजिका डॉ. कल्पना पांडे व पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर हे दावेदार आहेत. पांडे या नागपूरच्या माजी महापौर असून विद्यापीठ शिक्षण मंचमध्ये सक्रिय आहेत. तर अनिल शिवणकर हे अभ्यासू कार्यकर्ते असून शिक्षक आघाडी मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गेल्यावेळी गाणार यांना विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला. ते मतांचा कोटा पूर्ण करू शकले नाहीत. अखेर ११ व्या फेरीत मताच्या फरकाने विजयी झाले होते. मग यावेळी शिक्षक परिषदेला थांबवून पक्षाच्या संघटनेतील उमेदवारास संधी देण्यास काय हरकत आहे, अशी बाजू मांडली जात आहे.

मतदार नोंदणीची अंतिम मुदत ७ नोव्हेंबर आहे. असे असताना अद्याप भाजपने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. असाच विलंब झाला तर भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे चर्चा करून याबाबतीत निर्णय घेणार आहेत.

औरंगाबादचा फाॅर्म्युला लागू करा

- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात भाजपने प्रा. किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप पक्ष म्हणून औरंगाबादची निवडणूक लढणार आहे. तोच फॉर्म्युला नागपुरातही लागू करावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीची आहे. भाजपकडून निर्णय घेण्यात वेळ लागत असल्यामुळे सकारात्मक निर्णय होण्याची शिक्षक आघाडीला आशा आहे.

फुले-शाहू-आंबेडकर अध्यापक परिषदही रिंगणात

- फुले-शाहू-आंबेडकर अध्यापक परिषदेनेही साहित्यिक प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांना उमेदवारी जाहीर करीत या निवडणुकीत उडी घेतली आहे. खोब्रागडे हे नागपुरातील डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी येथे मराठी व पदव्युत्तर विभागाचे विभागप्रमुख आहेत. २०१९ मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या अ. भा. आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. १६ ऑक्टोबर रोजी राज्य कार्यकारिणीने एकमताने खोब्रागडे यांच्या उमेदवारीचा ठराव पारित केला.

 

Web Title: BJP also in confusion, support for singers or new candidate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.