"भारतातील मीडिया काल जितका स्वतंत्र होता, तसा आजही आहे आणि भविष्यातही राहील"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 07:02 PM2023-04-02T19:02:58+5:302023-04-02T19:18:45+5:30
अभिव्यक्तीची स्वतंत्रता तर आहेच पण ती त्याच जबाबदारीनं पार पाडणंही महत्वाचं
नागपूर : गेल्या एका दशकात अनेको बदल झाले. रेडिओ, वृत्तपत्र, टीव्ही यांनी विविध प्रकारे बातम्या प्रकाशित केल्या. पण आता बदलत्या काळात इंटरनेट आलाय त्यामुळे सामान्य व्यक्तिच्या हातात सोशल मिडियाच्या रुपात माध्यम उपलब्ध झालाय. आणि त्यानुसार मीडियातही बदल होत आहेत. पण त्यामुळे मीडियाचं ध्रुवीकरण होत आहे, हे म्हणणं योग्य होणार नाही. भारतातील मीडिया काल जितका स्वतंत्र होता तितकाच आजही आहे आणि उद्याही राहील. अभिव्यक्तीची स्वतंत्रता तर आहेच पण ती त्याच जबाबदारीनं पार पाडणंही महत्वाचं. लोकांपर्यंत बातमी पोहचवण्याचं केवळ वृत्तपत्र, चॅनेल एकच माध्यम नाही. तर डिजिटल माध्यमेही आहेत असंही ठाकूर म्हणाले.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी तथा लोकमतनागपूरच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रविवारी, २ एप्रिल रोजी ‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का?’ या विषयावर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये दुपारी ३ वाजता ‘लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले. या मीडिया कॉनक्लेव्हमध्ये केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. लाेकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.
कोविडच्या काळात माध्यमांनी ज्याप्रकारे कव्हरेज केलं त्यात काहिंनी ज्याप्रकारे अनुचित वृत्त प्रकाशित केलं त्याने देशाची प्रतिमा मलिन झाली. काहींनी कोविड वॅक्सिनवरही प्रश्न उपस्थित केले. पण, वॅक्सिनेशन यशस्वी झालं. विश्वासार्हता कुणाची टिकून आहे? आपण जे दाखवत आहात ते जनतेला पटतयं की नाही, ते ही पाहणं महत्वाचं आहे. आज फक्त वृत्तपत्र, टीव्ही या माध्यमांव्यतिरिक्त डिजीटल मीडियाचं जाळं जगभरात पसरलयं. त्यातून वृत्त क्षणात सर्वत्र पसरतं, फेक न्यूजही त्याच प्रमाणात पसरतात. वृत्त खरे, खोटे याबाबतची विश्वासार्हता पाहण्यासाठी आम्ही फॅक्ट चेकद्वारे तपासणीही करीत असतो,असं ठाकूर म्हणाले. माध्यमांनी रिसर्च करणे बंद केले का? सोशल मीडियात जुने रेकॉर्ड टाकले जातात. माध्यमांची भूमिका सोशल मीडियात निभावते असंही ठाकूर यांनी सांगितलं.
भारताचा विकास विदेशी मीडियाच्या पचनी पडत नाहीये
जे विकू शकेल तीच बातमी आहे असं माध्यमांच्या कार्यालयात म्हटलं जाते. याला जबाबदार कोण? माध्यमांमध्ये अनेक उद्योगपतींचा पैसा लागलाय त्यामुळे हे असू शकते. आता या आव्हानांमधून बाहेर पडण्याचं काम पत्रकारांना करावे लागणार आहे. नव्या आव्हानात गुण-दोष दोन्ही पाहायला हवेत असंही ठाकूर यांनी म्हटलं. जगभरात नव्या भारताचे नॅरेटीव्ह देण्याचं काम भारताचे नागरिक व भारतीय मीडिया करेल. जगभरात इंटरनेच्या वापरकर्त्यांमध्ये भारत पुढे आहे. गावागावांत ऑप्टिकल फायबरचं जाळ पसरलं आहे. भारताची स्वत:ची 4जी, 5जी टेक्नॉलॉजी आहे व 6जी देखील भारतीय असेल असंही त्यांनी सांगितलं.
भारत झपाट्याने विकसीत होतोय. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात अनेक विकासकार्य झालेत. सफल वॅक्सिनेशन, मेट्रो, हाय स्पीड इंटरनेट सुविधा, रोजगार, अन्नवाटप योजना आदि कार्य सफलतेने पार पडले. परंतु, विदेशी मीडियाला हे पचनी पडलेलं दिसत नाही. त्यांच्या वृत्तात याचा उल्लेख दिसत नाही. अमृतकाळापासून स्वर्णमकाळापर्यंत भारतीय मीडिया राष्ट्रसेवेचं कार्य करत राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.