भाजपा व काँग्रेस एकाच माळेचे मणी - अंजली दमानियांचा आरोप
By Admin | Published: July 18, 2016 09:08 PM2016-07-18T21:08:02+5:302016-07-18T21:08:02+5:30
काँग्रेस असो वा भाजपा यापैकी कोणीही भ्रष्टाचार थांबवू शकत नाही. हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, असा आरोप भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या व 'आप'तर्फे लोकसभा निवडणूक
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १८ - काँग्रेस असो वा भाजपा यापैकी कोणीही भ्रष्टाचार थांबवू शकत नाही. हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, असा आरोप भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या व 'आप'तर्फे लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या नेत्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पत्रकारांसोबत बोलताना केला. उच्च न्यायालयात बिडी कामगारांच्या याचिकेवर सुनावणी होती. त्यासाठी त्या नागपुरात आल्या होत्या.
एकनाथ खडसे यांना 'क्लीन चिट' मिळाल्यामुळे भाजपाला स्वत:चा बचाव करण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे. या विषयावर चर्चेचे आव्हान दिल्यास भाजपा आता खडसेंना ह्यक्लीन चिटह्ण मिळाल्याचे उत्तर देऊ शकतात. यामुळे भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खडसे यांनी अब्रुनुकसानीचे ११ दावे दाखल केले असून त्याचे स्वागत करते. एक दिवस खडसे यांचा भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवेल, असे दमानिया यांनी सांगितले.
जयकुमार रावल यांना, ते राजनाथसिंग यांचे नातेवाईक असल्यामुळे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. ते भ्रष्टाचारी नेते आहेत. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे व रणजित पाटील यांच्याविरुद्धही भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. गेल्या काही महिन्यांत राज्यातील भ्रष्टाचार वाढल्यामुळे ह्यकोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझाह्ण असे म्हणावे लागते, अशी टीका दमानिया यांनी केली.
सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीत अद्याप समाधानकारक प्रगती झालेली नाही. ही चौकशी उपयोगी सिद्ध होईल, असे वाटत नाही. या घोटाळ्यात भाजपाचे कंत्राटदार नेते गुंतलेले आहेत. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मदत लागू शकते, असे भाजपाला वाटते. यामुळे अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावा दमानिया यांनी केला.