भाजपने नगरसेवकांना मागितले ‘रिपोर्ट कार्ड’
By admin | Published: July 20, 2016 02:03 AM2016-07-20T02:03:01+5:302016-07-20T02:03:01+5:30
महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना आपले बहुतांश नगरसेवक निष्क्रिय झाले आहेत, असे भाजपचे निरीक्षण आहे. त्यामुळे
२५ आॅक्टोबरपर्यंतची डेड लाईन: प्रत्येक कामाचे भूमिपूजन घ्या
कमलेश वानखेडे ल्ल नागपूर
महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना आपले बहुतांश नगरसेवक निष्क्रिय झाले आहेत, असे भाजपचे निरीक्षण आहे. त्यामुळे या नगरसेवकांना ताळ्यावर आणण्यासाठी भाजपने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या प्रत्येक
नगरसेवकाने गेल्या साडेचार वर्षांत कोणकोणती कामे केली, याचा सविस्तर अहवाल २५ आॅक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर कामाचा लेखाजोखा मांडणारे प्रसिद्धीपत्रक काढून त्याचे प्रभागात वितरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
भाजपच्या दोन दिवसीय अभ्यासवर्गाचा नुकताच समारोप झाला. या अभ्यासवर्गादरम्यान शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. त्याची नगरसेवकांच्या वर्तुळात जोरात चर्चा सुरू असून नगरसेवकांनी धास्ती घेतली आहे.
प्रभागात ५० हजार रुपयांचेही विकास काम केले जात असेल तर त्याचे स्वतंत्र भूमिपूजन घ्या. भूमिपूजनाला त्या भागातील नागरिकांना निमंत्रित करा. त्या कामाचे मार्केटिंग करा. आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवा. बूथ मेळावे घ्या. केलेल्या कामाची पत्रके छापून ती प्रभागात घरोघरी वितरित करा,असे निर्देश नगरसेवकांना देण्यात आले आहेत.
आपल्यशिवाय पक्षाला पर्याय नाही, हे एकाही नगरसेवकाने गृहित धरू नका. भाजपकडे खूप पर्याय आहेत. तुल्यबळ कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. यापुढे नगरसेवक महापालिकेत नव्हे तर प्रभागात दिसला पाहिजे. पक्षाची प्रत्येकावर नजर असेल, असेही नगरसेवकांना बजावण्यात आले आहे. दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी न केल्यास दखल घेऊ.
परफॉर्मन्स न दिल्यास तिकीट कापण्यासाठी पक्ष मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही नगरसेवकांना देण्यात आला आहे.
भाजपच्या सर्वेक्षणात
नगरसेवक अडचणीत
४भाजपतर्फे करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात काही नगरसेवक अडचणीत असल्याचे आढळून आले आहे. पक्षाने येत्या महापालिकेच्या निवडणुकीत ‘१०० प्लस’चे लक्ष्य निश्चित केले असताना, विद्यमान नगरसेवकच जिंकण्याच्या स्थितीत नसतील तर त्यांचे तिकीट बदलल्याशिवाय पर्याय नाही, या मतावर पक्ष पोहचला आहे. त्यामुळे कामांचा अहवाल मागून पक्ष या नगरसेवकांना एक संधी देऊ पाहत आहे. येत्या तीन महिन्यात कामात सुधारणा केल्याचे दिसून आले तर यात संबंधित नगरसेवकांच्या बाबतीत पुनर्विचार होऊ शकतो, असे भाजपच्या एका मोठ्या नेत्याने स्पष्ट केले.