रामटेकच्या गडावर भाजपाची चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 08:39 PM2019-02-16T20:39:53+5:302019-02-16T20:41:26+5:30
एकीकडे दिल्ली-मुंबईत भाजपा- शिवसेनेत युतीची बोलणी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडे असलेल्या रामटेक लोकसभेच्या जागेवर भाजपाने चढाई सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षात शिवसेनेने भाजपाला सहकार्य केले नाही. आडमुठी भूमिका घेतली, असा ठपका ठेवत या मतदारसंघात भाजपाचे संख्याबळ व संघटनात्मक ताकद शिवसेनेपेक्षा जास्त असल्यामुळे ही जागा या वेळी भाजपालाच द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी पक्षाला दिला आहे.
कमलेश वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे दिल्ली-मुंबईत भाजपा- शिवसेनेत युतीची बोलणी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडे असलेल्या रामटेक लोकसभेच्या जागेवर भाजपाने चढाई सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षात शिवसेनेने भाजपाला सहकार्य केले नाही. आडमुठी भूमिका घेतली, असा ठपका ठेवत या मतदारसंघात भाजपाचे संख्याबळ व संघटनात्मक ताकद शिवसेनेपेक्षा जास्त असल्यामुळे ही जागा या वेळी भाजपालाच द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी पक्षाला दिला आहे.
रामटेकच्या जागेसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉ. पोतदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या चारही प्रमुख नेत्यांकडे रामटेकच्या मागणीचा सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. जिल्ह्यात ६ पैकी ५ आमदार भाजपाचे आहेत. जिल्हा परिषदेतील ५९ पैकी २३ सदस्य, पंचायत समितीचे ११८ पैकी ४२ सदस्य भाजपाचे आहेत. १३ पैकी ९ नगर परिषद व ६ पैकी ५ नगर पंचायत भाजपाच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यातील एकूण ३६७ नगरसेवकांपैकी १८५ नगरसेवक भाजपाचे आहेत. ७६९ पैकी अर्ध्याहून जास्त ग्राम पंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत. ६० टक्क्यांहून अधिक ग्राम पंचायत सदस्य आहेत. रामटेक लोकसभेत २३४५ बूथ आहेत. या प्रत्येक बूथवर भाजपाने एक अध्यक्ष व २५ ते ३० पदाधिकारी यांची समिती स्थापन केली आहे. त्यामुळे सुमारे ८० हजार कार्यकर्त्यांचे नेटवर्क सज्ज आहे. या तुलनेत शिवसेना भाजपाच्या आसपासही नाही. जिल्ह्यात भाजपाची एवढी मोठी राजकीय शक्ती असताना ही जागा शिवसेनेला का द्यायची, असा प्रश्न भाजपा नेत्यांनी उपस्थित केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करीत शिवसेनेला विजयी केले. मात्र, विधानसभेत शिवसेना वेगळी लढली असती तरतिची खरी ताकद दिसून आली. त्यामुळे भाजपाच्या जोरावर दुसरा पक्ष मोठा करण्यापेक्षा आपल्याच पक्षातील उमेदवाराला संधी द्यावी, अशी भूमिका भाजपा नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. नुकतेच सुरेश भट सभागृहात नागपूर, रामटेक व भंडारा-गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी उघडपणे तुमाने यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद न ठेवल्याचा आरोप करीत त्यांचे काम समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवला. कुठल्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनेकडून खेचून भाजपाकडे आणा, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपा जिल्हाध्यक्षांनी घेतलेल्या या उघड भूमिकेमुळे स्थानिक पातळीवरही भाजपा-सेनेत धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप नेत्यांच्या मनातील खदखद
जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला युती करण्याचा आग्रह करूनही केली नाही. त्यामुळे काही जागांवर भाजपाला अकारण फटका बसला.
जिल्हाध्यक्ष पोतदार यांच्या कळमेश्वरात शिवसेनेने युतीसाठी नगराध्यक्षपद देण्याची अट घालून भाजपाची कोंडी केली. शेवटी युती झाली नाही.
खा. कृपाल तुमाने यांची काँग्रेसच्या एका नेत्याशी जवळीक आहे. त्यामुळे त्या विधानसभा मतदारसंघात भाजपाला शिवसेनेकडून कोणताही फायदा होत नाही, असा भाजपा नेत्यांचा आरोप आहे.
भाजप- सेनेत स्थानिक पातळीवर काही मुद्यांवर मतभेद झाले. मात्र, शिवसेना नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन ते मिटविण्यासाठी पुढाकार घेतला नाही.
तुमाने यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांची कामे केली नाही, अशीही नाराजी आहे.
भाजपाच्या आमदारांचीही नाराजी
भाजपाच्या ग्रामीणमधील दोन आमदारांची शिवसेनेवर प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेला ही जागा दिली तर आमच्या कडून फारशा अपेक्षा ठेवू नका, असे या आमदारांनी पक्षाला कळविले आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. मात्र, त्यानंतर खासदारांचे काम समाधानकारक नाही. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद न ठेवल्यामुळे नाराजी आहे. रामटेकची राजकीय परिस्थिती पाहता ही जागा आता भाजपाला हवी आहे.
डॉ. राजीव पोतदार,
जिल्हाध्यक्ष भाजपा