सीएएविरोधातील आंदोलनात भाजपाकडून निर्दयपणे दडपशाही : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 08:53 PM2019-12-20T20:53:12+5:302019-12-20T20:55:27+5:30
: ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यातच सीएएविरोधात भडक आंदोलने भडकली आहे. मात्र भाजपा हे वातावरण शांत करण्याऐवजी निर्दयपणे दडपत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यातच सीएएविरोधात भडक आंदोलने भडकली आहे. मात्र भाजपा हे वातावरण शांत करण्याऐवजी निर्दयपणे दडपत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.
चव्हाण म्हणाले, सीएएला असलेला विरोध शांततामय मार्गाने प्रदर्शित करावा, असे आपले जनतेला आवाहन आहे. महाराष्ट्रात शांतपणे विरोध दर्शविला जात आहे. पोलीसही ही परिस्थिती येथे उत्तमपणे हाताळत आहेत. हा कायदा घटनाविरोधी असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. महाराष्ट्र सरकार हा लागू करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे राज्य सरकारची या संदर्भात भूमिका स्पष्ट आहे.
ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे, तिथेच ही आंदोलने अधिक तीव्रपणे पेटली आहेत. हे वातावरण योग्य परिस्थिती हाताळून शांत करण्याची गरज असताना केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन हाताळत आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हट्टाने हा कायदा देशात लागू करू पहात आहे. यामुळे धर्मनिरपेक्षता बाजूला पडून एका धर्माचे प्राबल्य वाढविण्याचा आणि अल्पसंख्यकांना डावलण्याचा त्यांचा डाव यामागे दिसत आहे. धर्म हा कोणत्याही देशाचा आधार होऊ शकत नाही. असे असतानाही राष्ट्रीया स्वयंसेवक संघाचा अजेंडा धर्माचे प्राबल्य वाढविणे हाच आहे. तोच अजेंडा भाजपा सरकार चालवित आहे. यामुळेच देशात संघर्षाची परिस्थिती उद्भवली आहे.
भारतामध्ये सुरू असलेल्या या घडामोडीकडे युरोपियन देशांचे लक्ष असून तेथील राजदूतांनी त्या संदर्भातील अहवालही संबंधित राष्ट्रांना पाठविला आहे. या घटनेमुळे सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या भारताची प्रतिमा आंतराष्ट्रीय पातळीवर मलिन होत असल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.