‘समझोता’वरून चंद्रशेखर बावनकुळे-अनिल देशमुख आमनेसामने

By कमलेश वानखेडे | Published: February 14, 2023 05:01 PM2023-02-14T17:01:00+5:302023-02-14T17:04:46+5:30

बावनकुळे म्हणतात मी तोंड उघडले तर देशमुख अडचणीत येतील; जे सांगायचेय ते खुलेआम सांगावे म्हणत देशमुखांचं आव्हान

BJP Chandrashekhar Bawankule- NCP Anil Deshmukh face to face over 'Samjhota' | ‘समझोता’वरून चंद्रशेखर बावनकुळे-अनिल देशमुख आमनेसामने

‘समझोता’वरून चंद्रशेखर बावनकुळे-अनिल देशमुख आमनेसामने

googlenewsNext

नागपूर : अडीच वर्षांपूर्वी आपण ‘समझोता’ केला नाही म्हणून तुरुंगात जावे लागले. या माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला. मी बोललो तर देशमुख अडचणीत येथील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. त्यावर देशमुख यांनीही बावनकुळे यांना जे सांगायचे आहे ते उघडपणे सांगावे, असे आव्हान दिले.

अडीच वर्षांपूर्वी मी समझोता केला असता तर मला अटक झाली नसती. पण खोटा समझोता किंवा खोटे आरोप करणार नाही, असे मी स्पष्टपणे सांगितले, असे शरद पवार यांच्या उपस्थितीत वर्धा येथे झालेल्या सभेत अनिल देशमुख बोलले होते. यावर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी काय झाले होते, याबाबत आपण तोंड उघडले तर अनिल देशमुख अडचणीत येतील, असा सूचक इशारा दिला. बावनकुळेंच्या या इशाऱ्याचा संबंध देशमुख हे भाजपकडून विधानसभा निवडणूक लढण्याचा प्रयत्नात होते, या चर्चेशी जोडला जात आहे. पण उघडपणे बावनकुळे यांनी तसे स्पष्ट केलेले नाही. अनिल देशमुख हे जामिनावर बाहेर आहेत, ते निर्दोष सुटलेले नाही, याचे त्यांनी भान ठेवावे, असेही बावनकुळे म्हणाले.

याबाबत पत्रकारांनी विचारले असता देशमुख म्हणाले, आपण वर्धेच्या सभेत जे बोललो त्याचा संदर्भ बावनकुळे यांना माहीत नाही. हा विषय ज्यांना समजायला हवा त्यांना समजला आहे. ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते काहिही बोलू शकतात. एवढ्या वर्षांपासून मी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काम करीत आहे व पुढे किती संकट आले तरी पवारांची साथ सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP Chandrashekhar Bawankule- NCP Anil Deshmukh face to face over 'Samjhota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.