"राज्यपाल कोश्यारी छत्रपतींच्या प्रेरणेने काम करतात, पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही"

By योगेश पांडे | Published: November 22, 2022 04:50 PM2022-11-22T16:50:26+5:302022-11-22T16:52:51+5:30

इतिहासापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर वक्तव्य व्हावीत; चंद्रशेखर बावनकुळे

BJP Chandrashekhar Bawankule reacted on Governor Bhagat Singh Koshyari remark on Chhatrapati Shivaji Maharaj | "राज्यपाल कोश्यारी छत्रपतींच्या प्रेरणेने काम करतात, पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही"

"राज्यपाल कोश्यारी छत्रपतींच्या प्रेरणेने काम करतात, पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही"

Next

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात आल्यापासून सातत्याने छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनेच काम केले आहे. त्यांच्या भाषणात नेहमीच छत्रपतींचा उल्लेख असतो. त्यांनी कधीही इतिहास किंवा छत्रपतींच्या प्रतिमेला ठेच पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र त्यांनी त्यादिवशी कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. ते नागपुरात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता छत्रपतींची प्रेरणा घेऊन काम करतो. शरद पवार, नितीन गडकरी मंचावर असताना त्यांचा गौरव करणे ठीक आहे. या नेत्यांचा गौरव करण्याचा त्यांचा हेतू होता. पण महाराजांना कमी लेखण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र छत्रपतींबाबत त्यांनी जे वक्तव्य केले त्याचे समर्थन होऊ शकत नाही. इतिहासावर कुणी जाऊ नये, विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे. टीकाटिप्पणी करण्यासाठी अशा मुद्द्यांवर बोलू नये, असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची गळाभेट का घेतली ?

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत लाजीरवाण्या शब्दात टीका केली. त्याची संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली. पण आदित्य ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे हिंदुत्व, शिवाजी महाराज किंवा सावरकर या विषयांची काळजी असती तर अशी गळाभेट का घेतली असा सवाल बावनकुळे यांनी केला.

राज्यात १६४ वरून १८४ जागांवर जाणार

कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना विविध पक्षांचे ५०० लोक भाजपमध्ये आले. सध्या राज्यात आमचे व मित्रपक्षांचे १६४ उमेदवार आहेत व लवकरच ते १८४ जागांवर पोहोचतील. २०२४ च्या निवडणूकांत महाविकास आघाडीला उभे करण्यासाठी सक्षम उमेदवार सापडणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना आता यावर अधिक काही बोलू नये. आमचे सरकार स्थिर आहे. सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला. २७ वर्षांत गुजरातच्या इतिहासात प्रथमच १४५ हून अधिक जागा घेऊन भाजपचे सरकार येईल, असेदेखील ते म्हणाले.

उद्धव ठाकरे ओवैसींसोबतदेखील युती करू शकतात

छत्रपती शिवरायांच्या विचारांवर तयार झालेली शिवसेना आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून तयार केलेल्या शिवसेनेला मूठमाती देण्याचे काम सद्यःस्थितीत सुरू आहे. आपला पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आता काहीही करू शकतात. उद्या ते समाजवादी पार्टी, अबू आझमी किंवा असदुद्दीन ओवेसींसोबत बैठका घेऊन युती करू शकतात. मताच्या राजकारणासाठी ते आता कुठल्याही पातळीला जाऊ शकतात, असे आमदार बावनकुळे म्हणाले. 

Web Title: BJP Chandrashekhar Bawankule reacted on Governor Bhagat Singh Koshyari remark on Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.