नागपूर जिल्ह्यातील काटोलवर सेनेचा दावा, भाजपनेही थोेपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:19 AM2019-07-27T11:19:45+5:302019-07-27T11:21:29+5:30

विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या काटोल मतदार संघात जागा वाटपावरुन भाजप-सेना नेतृत्वाचा कस लागणार आहे. इकडे गेलेला मतदार परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी कंबर कसली आहे.

BJP claims over Katol in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील काटोलवर सेनेचा दावा, भाजपनेही थोेपटले दंड

नागपूर जिल्ह्यातील काटोलवर सेनेचा दावा, भाजपनेही थोेपटले दंड

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या अस्तिवाची लढाईशेकापला हवी आघाडीत जागा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या काटोल मतदार संघात जागा वाटपावरुन भाजप-सेना नेतृत्वाचा कस लागणार आहे. इकडे गेलेला मतदार परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी कंबर कसली आहे. मात्र आघाडीत ही शेकापला सोडण्यात यावी, अशी मागणी पुढे आल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काटोलमध्ये सेनेला २२ हजार २०३ मतांची लीड मिळाली. युतीची ताकद वाढली. पारंपरिक जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेच्या कोट्यात आहे. युतीच्या विजयात दोन्ही पक्षाचा वाटा असल्याने येथे विधानसभेसाठी भाजप-सेनेने दावा केला आहे.
२०१४ मध्ये येथे चौरंगी लढतीत भाजपचे आशिष देशमुख यांनी विजय मिळविला. सेनेच्या पारंपरिक मतदार संघ आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने बाजी मारली. २०१८ मध्ये देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम केला. मात्र देशमुख यांचा विजय भाजपाचा होता. या मतदार संघात भाजपाचे पक्षसंघटन मजबूत असल्याने युतीत ही जागा भाजपसाठी सोडण्यात यावी, असा युक्तिवाद भाजपाचे नेते करीत आहेत. विधानसभा लढण्याच्या दृष्टीने येथे भाजपाने तयारी चालविली आहे. भाजपकडून येथे विधानसभा प्रमुख आणि काटोल नगर परिषदेचे सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर प्रबळ दावेदार आहेत. मात्र देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर अविनाश ठाकरे या मतदारसंघात सक्रिय झाले. गत वर्षभरात येथे पक्षसंघटन बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका वठविली. त्यामुळे ठाकरेही काटोलसाठी इच्छुक आहेत.
विधानसभेपूर्वी जिल्हा परिषद निवडणुका झाल्या तर काटोल पंचायत समितीचे माजी सभापती संदीप सरोदे यांचाही काटोलसाठी दावा असणार आहे. जागा वाटपात काटोलची जागा सेनेच्याच वाट्याला येणार असे स्पष्ट करीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नरखेड पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र हरणे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २००४ च्या निवडणुकीत सेनेकडून लढणारे सतीश शिंदे यांच्यावेळी कुणासोबत राहणार याकडे लक्ष लागले आहे. इकडे आघाडीत काटोलची जागा शेकापसाठी सोडण्यात यावी अशी गुगली राहुल देशमुख यांनी टाकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहे. कॉँग्रेस मात्र येथे आघाडी धर्म पाळण्याच्या भूमिकेत आहे.
कुणबी, तेली आणि दलित मतदारावर भिस्त असलेल्या मतदार संघावर वंचित बहुजन आघाडीचाही डोळा आहे. राष्ट्रवादीला टक्कर देणाºयाला येथे वंचितची उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

आशिष देशमुख कुणासोबत?
काका अनिल देशमुख यांचा पराभव करणारे आशिष देशमुख आज कॉँग्रेसमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यासाठी काटोल-नरखेडमध्ये मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते आघाडी धर्म पाळतील का याकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: BJP claims over Katol in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.