नगरसेवकांसाठी तयार होतेय भाजपची आचारसंहिता
By admin | Published: March 8, 2016 03:00 AM2016-03-08T03:00:19+5:302016-03-08T03:00:19+5:30
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू व्हायची असली तरी भाजपने आपल्या नगरसेवकांसाठी आचारसंहिता
नागपूर : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू व्हायची असली तरी भाजपने आपल्या नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करण्याची तयारी चालविली आहे. नगरसेवकाने लोकांशी कसे वागावे, काय करावे, पक्ष संघटनेशी कसा समन्वय साधावा आदी बाबींवर यात भर दिला जाणार आहे. नुकतेच शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी भाजप नगरसेवकांची महापालिकेत एक बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांना यातील काही निवडक सूचना देण्यात आल्यात. लवकरच नगरसेवकांची बैठक घेऊन संबंधित आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
भाजपचे काही नगरसेवक जनसंपर्कात बरेच माघारले आहेत. त्यांचा परफॉर्मन्सही पाहिजे तसा नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या प्राथमिक पाहणीत समोर आला आहे. पक्षातर्फे या पाहणीची जाहीर वाच्यता करणे टाळले जात आहे. मात्र, पक्षाने याची वेळीच दखलही घेतली आहे. गेल्या आठवड्यात शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी नगरसेवकांची घेतलेली बैठक याचाच एक भाग होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत कोहळे यांनी नगरसेवकांना सूचक इशारा दिला. सोबतच काम चांगले असणाऱ्यांनाच तिकीट मिळेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री हे महापालिका निवडणुकीप्रती गंभीर असून ते देखील शिफारशींची दखल घेणार नाहीत, असेही स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून नागपूरसाठी सुमारे १८ हजार कोटी रुपये खेचून आणले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत निधी दिला आहे. आमदारांना वाढीव निधी दिला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्या कार्यकाळात २८३ कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या सर्व निधीतून काही विकास कामे सुरू झाली असून काही कामे पुढील दोन-तीन महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच प्रभागात विविध विकास कामे सुरू असल्याचे चित्र पुढील चार-सहा महिन्यात पहायला मिळणार आहे. त्यामुळे विकास कामांसाठी पैसा नाही, अशी ओरड नगरसेवकांना करता येणार नाही. अवाजवी कारणे देता येणार नाहीत. नगरसेवकांनी दिलेल्या कारणांचीही पडताळणी केली जाणार आहे.
अशी आहे आचारसंहिता
४पक्षाविषयी, पक्षातील नेत्यांविषयी वाईट मत व्यक्त करून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.
४पक्षाच्या बैठकांना, कार्यक्रमांना अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांचा रेकॉर्ड तयार केला जाईल.
४जनसंपर्क वाढवून नागरिकांचे प्रश्न सोडवा.
४जनधन योजना, पंतप्रधान आवास योजना, सुकन्या योजना, वीमा सुरक्षा योजना यासह मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना, आदी योजना जनतेपर्यंत घेऊन जा. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज भरा.
४पाणी व मालमत्ता कराचे बिल जास्त आल्याची नागरिकांची तक्रार असेल तर संबंधितासोबत झोन कार्यालयात जाऊन त्याच्या समस्येचे निराकरण करण्यास मदत करा.