भाजपा, काँग्रेस विरुद्ध लढण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:40 AM2017-10-15T00:40:09+5:302017-10-15T00:40:27+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असे आश्वासन देऊन सत्तेत आलेली भाजपा २०१९ मध्ये विदर्भ राज्य देईल, या स्वप्नात राहू नका. भाजपा विदर्भ राज्य देणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असे आश्वासन देऊन सत्तेत आलेली भाजपा २०१९ मध्ये विदर्भ राज्य देईल, या स्वप्नात राहू नका. भाजपा विदर्भ राज्य देणार नाही. कारण काँग्रेस आणि भाजपा हे दोघेही विदर्भ व एकूणच नवीन राज्य निर्माण करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांसह देशातील सर्वच नवीन राज्याची मागणी करणाºयांनी स्वत:ची स्थानिक स्तरावर राजकीय शक्ती निर्माण करण्याची गरज आहे. काँग्रेस आणि भाजपाविरुद्ध थेट निवडणूक लढण्याची गरज आहे. राजकीय पक्षांमध्ये विश्वसनीय पर्यायी भीती निर्माण होत नाही तोपर्यंत दिल्लीत सत्तेवर असलेल्यांवर दबाव निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक आणि नवराज्य निर्माण महासंघाचे अध्यक्ष माजी महाधिवक्ता अॅड श्रीहरी अणे यांनी येथे केले
विदर्भ राज्य आघाडीतर्फे नॅशनल फेडरेशन आॅफ न्यू स्टेट्स (नवराज्य निर्माण महासंघाचे) पहिले राष्ट्रीय अधिवेशन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नवराज्य निर्माण महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष राजा बुंदेला हे प्रमुख अतिथी होते. तसेच पूर्वांचल अॅक्शन ग्रुपचे पंकज कुमार जायस्वाल, आॅल बोडो स्टुडंट युनियनचे अध्यक्ष प्रमोद बोरो, कुसुम स्वर्गीयाशी, लॉरेन्स इशाराशी, पीपल्स जॉर्इंट अॅक्शन कमेटी फॉर बोडोलॅण्ड मुव्हमेंटचे मुख्य संयोजक राकेश बोरो, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड (प्रोग्रेसिव्ह) धीरेन बोरो, कुकीलॅण्ड स्टेट डिमांड कमेटीचे शेबोई हाऊकीप, के हाऊको गांगटे, कार्बी आँगलॉन पॉर्इंट अॅक्शन कमिटी फॉर आॅटोनोमस स्टेटचे स्टॅलेन एंगटी आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलचे प्रमोद काडुंभरी प्रमुख पाहुणे होते.
अॅड. श्रीहरी अणे म्हणाले, गडकरी आणि फडणवीस यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांची एक मर्यादा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेच देश चालवित आहेत. त्यामुळे या दोघांनी ठरविले तरच स्वतंत्र विदर्भ राज्य होऊ शकते. हे दोघे तेव्हाच ऐकतील जेव्हा आपण आपली राजकीय शक्ती निर्माण करू. त्यासाठी भाजपा-काँग्रेस सोडून देशातील इतर राजकीय पक्षांची व नेत्यांची मदत घेऊन दबाव निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अॅड. नीरज खांदेवाले यांच्यासह बोडोलँड, बुंदेलखंड, गोरखालॅँड, कुकीलँड, पूर्वांचल, टिष्ट्वपरललँड आदींच्या प्रतिनिधींनी त्यांच्या राज्यातील भीषण परिस्थिती विशद करीत स्वतंत्र राज्याची आवश्यकता स्पष्ट केली. अॅड. रवी सन्याल यांनी भूमिका विशद केली.
रक्ताने नव्हे कायद्यानेच राज्य मिळेल
रक्त सांडवून आंदोलन केल्यामुळेच मागणी पूर्ण होत नाही. सरकार हे अहिंसेला घाबरते. हिंसेला ते आटोक्यात आणू शकते. याचे उदाहरण महात्मा गांधीजींनीच घालून दिले आहे. त्यामुळे नवीन राज्याची मागणी करण्यासाठी आंदोलन होईल, परंतु ते सनदशीर मार्गाने. रक्तरंजित आंदोलन होणार नाही, असेही अॅड. श्रीहरी अणे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी भेटतच नाहीत
स्वतंत्र विदर्भ राज्यासह देशातील विविध भागात सुरू असलेल्या स्वतंत्र राज्य मागणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ माागितला आहे. परंतु ते भेटायलाच तयार नाहीत. या अधिवेशनात पारित झालेले ठराव घेऊन पुन्हा २६ व २७ आॅक्टोबरला त्यांना व गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. वेळ मिळाला तर त्यांना निवेदन देऊन चर्चा करू, असेही अॅड. श्रीहरी अणे म्हणाले.