भाजप, काँग्रेसला नको मित्रपक्षांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2016 02:33 AM2016-07-11T02:33:57+5:302016-07-11T02:33:57+5:30

विधानसभा निवडणुकीत आघाडी अन् युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले.

BJP, Congress should not associate with ally | भाजप, काँग्रेसला नको मित्रपक्षांची साथ

भाजप, काँग्रेसला नको मित्रपक्षांची साथ

Next

महापालिका स्वबळावरच : स्थानिक नेत्यांची भूमिका
नागपूर : विधानसभा निवडणुकीत आघाडी अन् युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले. आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतही आघाडी व युती होण्याची शक्यता कमीच आहे. मित्रपक्षासाठी जागा सोडण्यापेक्षा आपल्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन बळ देण्याचा काँग्रेस व भाजपचा विचार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे युती किंवा आघाडी करून काहीच फायदा होणार नाही, असे या दोन्ही पक्षातील नेत्यांचे मत आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी व भाजप- शिवसेना युती करून लढली. जागा वाटपाच्या वेळी भाजपला काही महत्त्वाच्या जागा शिवसेनेच्या हट्टासाठी सोडाव्या लागल्या. तर काँग्रेसलाही राष्ट्रवादीसाठी एक पाऊल मागे घ्यावे लागले. स्वत:कडे पर्यायी तगडे उमेदवार असलेल्या तसेच जिंकण्याची शक्यता असलेल्या जागा मित्रपक्षांसाठी सोडल्यामुळे काँग्रेस व भाजपला नुकसान सहन करावे लागले. काही जागा अशा होत्या की त्या ठिकाणी काँग्रेस, भाजपा लढली असती तर विजय नोंदविला असता. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी सोडण्यात आल्यामुळे गमवाव्या लागल्या. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सहा व शिवसेनेलाही सहाच जागा जिंकता आल्या. मात्र, आता या सहा जागांसाठी २५ ते ३५ जागांसाठी तडजोड करण्यास काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे नेते तयार दिसत नाहीत.
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत सहज विजय मिळविता येईल, अशी शिवसेना व राष्ट्रवादीची शहरात स्थिती नाही. दोन्ही पक्षाचे काही नगरसेवक व काही इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये स्वबळावरही विजयी होण्याची क्षमता आहे. मात्र, सर्वच प्रभागात असे चित्र नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे नेते आघाडी व युतीसाठी इच्छुक असल्याचे जाणवते. नुकत्याच झालेल्या भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी उघडपणे ‘एकला चलोरे’चा नारा दिला. आपल्याच पक्षात सक्षम कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आता इतरांशी हातमिळवणी कशासाठी करायची, नागपुरात शेवटच्या घटका मोजत असलेल्या शिवसेनेशी युती करून ग्लुकोज कशासाठी द्यायचे, असे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, यावर शिवसेनेकडून कुठलेही उत्तर देण्यातआले नाही. शिवनसेना नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले. त्यामुळे भाजपचे मनोबल आणखी उंचावले आहे.
दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीचेही जुळण्याची शक्यता कमीच आहे. राष्ट्रवादीमुळे गेल्यावेळी काँग्रेसचे नुकसान झाले, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. चारच्या प्रभागात राष्ट्रवादीचा भार कशासाठी उचलायचा, तसेही राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, निवडणुकीच्या पूर्वी ते काँग्रेसवासी झालेले दिसतील, असे नेत्यांचे म्हणणे आहे.
तर खा. प्रफुल्ल पटेल हे नागपूरचे प्रभारी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. आपण लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढत नाही. काँग्रेसच्या मागे राहावे लागते. त्यामुळे पक्ष वाढत नाही.
आता महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली तर प्रत्येक प्रभागात पक्षाचा कार्यकर्ता तयार होईल. त्याचा भविष्यात पक्षाला फायदा होईल, असे विश्लेषण राष्ट्रवादीचे नेते देत आहेत.(प्रतिनिधी)

राष्ट्रवादीचा बसपाशी तर काँग्रेसचा रिपाइंशी युतीचा प्रयत्न
आपल्या परंपरागत मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. बसपाशी युती करता येईल का, यावर राष्ट्रवादीमध्ये विचारमंथन सुरू आहे. तर काँग्रेस रिपाइंच्या विविध गटांना एकत्र करून सोबत घेण्याच्या विचारात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही पक्षांना बसपा व रिपाइंकडून सध्यातरी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

Web Title: BJP, Congress should not associate with ally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.