भाजपचे नगरसेवक होले यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:54+5:302021-09-02T04:18:54+5:30
भाजपचे नगरसेवक होले यांचे उपोषण शहर काँग्रेसच्या अध्यक्षांनी सोडविले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय गांधी मार्केटमधील गाळे वाटपातील ...
भाजपचे नगरसेवक होले यांचे उपोषण शहर काँग्रेसच्या अध्यक्षांनी सोडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय गांधी मार्केटमधील गाळे वाटपातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, यासाठी बुधवारी महापौरांच्या कक्षापुढे भाजपचे नगरसेवक सतीश होले उपोषणाला बसले होते. याची दखल घेत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली व आश्वासन देऊन उपोषण सोडविले.
भाजपचे नगरसेवक असूनही विकास ठाकरे यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली. सात दिवसात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. त्यानंतर होले यांनी उपोषण मागे घेतले. मनपातील भाजप पदाधिकाऱ्यांनी होले यांच्या उपोषणाची दखल न घेता ठाकरे यांनी दखल घेतल्याची मनपात जोरदार चर्चा होती.
महापालिकेच्या सक्करदरा येथील राष्ट्रीय गांधी मार्केटमधील गाळे वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यातील दोषी अधिकारी व सहभागी लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नगरसेवक सतीश होले यांनी केली आहे.
यावेळी नगरसेवक संजय महाकाळकर, संदीप सहारे यांच्यासह मुकेश धावडे, रमेश कोलारकर, राजू लारोकर, संजय तराळे, सुभाष ढोले, गणेश मेश्राम आदी उपस्थित होते.