मुंढे यांच्या कक्षापुढे भाजप नगरसेवकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:06 AM2020-08-14T01:06:22+5:302020-08-14T01:08:00+5:30
कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कक्षाबाहेर धरणे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कक्षाबाहेर धरणे दिले.
२०१२ मध्ये महापालिका सभागृहात पाणीपट्टीत दरवर्षी पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही दरवाढ केली जाते. परंतु यावर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडाला, सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने पाणी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी. आमदार प्रवीण दटके सत्तापक्ष नेते संदीप जाधव ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आदींनी यावेळी केली. आंदोलनात मनपातील पदाधिकाऱ्यांसह ५० ते ६० नगरसेवक सहभागी झाले होते.
आंदोलनाबाबत नगरसेवकांत संभ्रम
करण्यात आलेली पाच टक्के पाणी दरवाढ मागे घ्यावी, यासाठी २० ऑगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला जाणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली, तरच दरवाढ मागे घेता येईल, अशी भूमिका आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. परंतु सभागृहात प्रस्ताव येण्यापूर्वीच आंदोलन केल्याने काही नगरसेवक संभ्रमात होते.