'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकावर बंदी घालण्याची भाजपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 07:12 PM2020-02-17T19:12:38+5:302020-02-17T19:18:30+5:30
'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा भाजपाचा आरोप
नागपूर - महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोन दिवसांवर आली असतानाच महाराजांवरील एका पुस्तकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महान नव्हते असे या पुस्तकात लिहिले आहे. शिवाजी महाराज हे मराठ्यांचे दैवत नव्हते, ते खंडणी वसूल करत, अशी भाषा या पुस्तकात वापरली आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.
या पुस्तकाचे लेखक डॉक्टर विनोद अनाव्रत हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांच्यावर आणि पुस्तक प्रकाशक, सुगावा प्रकाशन संस्थेच्या मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.