पाच जागांसाठी भाजपापुढे पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:41+5:302021-07-03T04:06:41+5:30
नागपूर : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वच जागांवर ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा केली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी न ...
नागपूर : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वच जागांवर ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा केली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी न करणाऱ्या उमेदवाराला या वेळी संधी न मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीतही अशा पाच जागांवरील पेच सुटलेला नाही.
जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, डॉ. राजीव पोतदार, अशोक मानकर, अशोक धोटे, कोषाध्यक्ष संजय टेकाडे आदी उपस्थित होते. किमान तीन तास बैठकीत चर्चा झाल्यानंतरही पाच जागांवर उमेदवारांचे नाव निश्चित झाले नाही. या जागांवर दोन ते तीन दावेदार आहेत. याशिवाय काँग्रेस- राष्ट्रवादीतील तुल्यबळ उमेदवार ऐनवेळी गळाला लागला तर त्याचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे. सध्यस्थितीत उमेदवारांची यादी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार असून त्यांच्या संमतीनंतर सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
विद्यमान चारही सदस्यांना संधी
- सदस्यत्व रद्द झालेले अनिल निदान, बाळू ठवकर, राजेंद्र हरडे, अर्चना गिरी यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले सदस्य विनोद ठाकरे यांची पत्नी सुचिता यांनाही डिगडोह या मतदारसंघातून तिकीट देण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.