नागपूर जिल्ह्यातील महादुला नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 09:52 AM2019-01-29T09:52:53+5:302019-01-29T09:53:34+5:30

भाजपा व काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या महादुला नगर पंचायतवर भाजपाने पुन्हा एकदा झेंडा फडकविला आहे.

BJP flag on Mahadula Nagar Panchayat in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील महादुला नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा

नागपूर जिल्ह्यातील महादुला नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा

googlenewsNext
ठळक मुद्देन.पं. निवडणूक निकाल बावनकुळेंचे वर्चस्व कायम राजेश रंगारी नगराध्यक्ष

दिनकर ठवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपा व काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या महादुला नगर पंचायतवर भाजपाने पुन्हा एकदा झेंडा फडकविला आहे. नगराध्यक्षपदासह ११ जागेवर दणदणीत विजय मिळवीत राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महादुला न.पं.वर पुन्हा एकदा वर्चस्व कायम ठेवले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे राजेश रंगारी यांनी ४,१६३ मते मिळवीत काँग्रेसचे रत्नदीप रंगारी यांचा २८० मतांनी पराभव केला. रत्नदीप यांना ३,८८३ मते मिळाली. महादुला नगर पंचायतसाठी रविवारी ६२.८२ टक्के मतदान झाले होते. कमी मतदानाचा कुणाला फायदा होईल, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मतदारांनी मात्र भाजपाला कौल दिला. एकूण १७ प्रभागात झालेल्या या निवडणुकीत ११ जागेवर भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळविला. काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. १७ ही प्रभागात बसपाच्या हत्तीने काँग्रेसच्या विजयाचे गणित बिघडविले.
बसपाने न.प.ची एक जागा मिळविली तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. शिवसेनेला मात्र खाते उघडता आले नाही. १७ नगरसेवकांच्या या नगर पंचायतमध्ये यापूर्वी भाजपाचे १५ तर काँग्रेसचे २ नगरसेवक होते. महादुला न.पं.साठी नगराध्यक्षपदासाठी अंत्यत चुरशीची निवडणूक झाली. मतमोजणीच्या पहिल्या दोन फेरीत काँग्रेसचे रत्नदीप रंगारी यांनी आघाडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मात्र त्यांच्या विजयाची घोडदौड अपक्ष आणि बसपा उमेदवाराने रोखली आणि भाजपचे राजेश रंगारी २८० मतांनी विजयी झाले.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत २८०९ मते मिळविणारे अपक्ष उमेदवार पवन पखिड्डे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपकडे नगराध्यक्ष पदासाठी पखिड्डे यांनी उमेदवारी मागितली होती. उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. भाजपातील काही असंतुष्टांचा पाठिंबा मिळेल व काँग्रेसचे जुने समर्थक आपल्या सोबत राहातील असे पखिड्डे यांचे विजयाचे गणित होते. त्यांच्या उमेदवारीने भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतावर निश्चितच प्रभाव पडला. काँग्रेसचे प्रेम गजभारे यांनी अपक्ष निवडणूक लढविल्याने यांचा फटकाही रत्नदीप रंगारी यांना बसला. गजभारे यांना ३५१ मते मिळाली. यासोबतच बसपाचे चिरकुट वासे यांनी ९०० मते मिळविल्याने काँग्रेसच्या विजयाची आशा मवाळ झाली.

महादुला नगर पंचायत निवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनतीने काम केले. जनतेने भाजपाच्या विकास कामाची पावती दिली. यासोबतच स्मार्ट महादुल्याच्या निर्मितीसाठी भाजपावर पुन्हा विश्वास टाकला आहे. तो सार्थ ठरविणे आता आमचे काम आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर जिल्हा

महादुल्याच्या जनतेने भाजपावर विश्वास दाखविला. हा कार्यकर्त्यांचा आणि महादुल्यातील जनतेचा विजय आहे.
- राजेश रंगारी, नवनिर्वाचित, नगराध्यक्ष

देशमुख यांचा विक्रम
प्रभाग क्रमांक १७ मधून अपक्ष असलेले मंगेश सुधाकर देशमुख यांनी ६५८ मते मिळवीत मोठ्या मताने विजय संपादित केला. त्यांनी भाजपाचे निखील कडू यांना १२७ तर काँग्रेसचे सचिन बोंडे यांना ८९ मतावर रोखले. देशमुख यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. कॉँग्रेसशी दुरावा निर्माण झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले.

Web Title: BJP flag on Mahadula Nagar Panchayat in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा