नागपूर जिल्हा नियोजन समितीवर भाजपाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 09:49 PM2017-11-29T21:49:21+5:302017-11-29T22:00:49+5:30

जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) च्या ४० जागांपैकी २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने २२ जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. एकहाती विजय मिळवून भाजपाने डीपीसीवर आपला झेंडा फडकवला आहे.

BJP flag on Nagpur District Planning Committee | नागपूर जिल्हा नियोजन समितीवर भाजपाचा झेंडा

नागपूर जिल्हा नियोजन समितीवर भाजपाचा झेंडा

Next
ठळक मुद्दे२५ पैकी २२ जागावर विजयकाँग्रेसला २ तर राष्ट्रवादीला १ जागा

आॅनलाईन लोकमत
नागपूर : जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) च्या ४० जागांपैकी २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने २२ जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. एकहाती विजय मिळवून भाजपाने डीपीसीवर आपला झेंडा फडकवला आहे.
महापालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतीवर वर्चस्व असल्याचा लाभ भाजपाला मिळाला. १९ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे मतमोजणी करण्यात आली. डीपीसीच्या २५ जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता़ यापैकी महापालिका क्षेत्रातून भाजपाचे सहा सदस्य अविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपाचे १६ उमेदवार निडणून आले. अशा प्रकारे भाजपाचे २२ उमेदवार निवडणूक जिंकले आहे. काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले.
महापालिकेत १५१ सदस्य आहेत. परंतु बसपाच्या १० तर शिवसेनेच्या २ सदस्यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे १३९ सदस्यांनीच मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचे १०८ व काँग्रेसचे २९, राष्ट्रवादी व अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. सदस्यांची संख्या विचारात घेता काँग्रेसच्या दोन जागा निवडून येतील अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु पक्षांतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला. त्यामुळे एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपाने या निवडणुकीचे नियोजन केले होते. त्यानंतरही क्रॉस व्होटींग झाले आहे. काँग्रेसमध्येही हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.
भाजपाचे अ‍ॅड. संजय बालपांडे यांना सर्वाधिक मते पडली. त्यांच्या मताचे मूल्य ३७०० इतके आहे. शेषराव गोतमारे ३५००, सुनील हिरणवार ३४९६, विशाखा मोहोड २८००, स्वाती आखतकर २८००, स्नेहल बिहारे २७५६, जगदीश ग्वालबंशी २९००, रवींद्र भोयर २८००, हरीश दिकोंडवार २८००, बाल्या बोरकर २७५० तर काँग्रेसच्या जिशानमुमताज अंसारी यांना २७०३ मूल्याची मते मिळाली. नगर परिषद क्षेत्रातील भाजपाच्या निरंजना पाटील व वंदना भगत यांना ५४, यशश्री नंदनवार ११०, कल्पना कळंबे १२५, विजयालक्ष्मी भदोरिया १३४ व मनोहर पाठक यांना १३१ मूल्याची मते मिळाली. काँग्रेसचे नरेश बर्वे यांना १२३ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुणवंत चामाटे यांना ३८ मते मिळाली.

ईश्वर चिठ्ठीत राष्ट्रवादीला जागा
डीपीसी निवडणुकीत नगरपंचायत क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गुणवंत चामाटे व भाजपाचे राजू सोमनाथ यांना सारखी ३८ मते मिळाली. समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात चामाटे विजयी ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला डीपीसीत खाते उघडता आले.

चार मते अवैध ठरल्याने पाटील पराभूत
भाजपाच्या उमेदवार प्रगती पाटील यांना मिळालेल्या मतापैकी चार मते अवैध ठरली. यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. मतदानापूर्वी भाजपाच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली होती. पक्षाच्या उमेदवारांना मतदान कसे करावे, या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही पाटील यांची चार मते अवैध ठरल्याने महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

 

Web Title: BJP flag on Nagpur District Planning Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.