जाहीरनाम्यासाठी भाजपचा फंडा, जनसामान्यांकडून सोशल मीडियावर मागविणार सूचना
By योगेश पांडे | Published: March 19, 2024 07:04 PM2024-03-19T19:04:25+5:302024-03-19T19:04:40+5:30
भाजपकडून अद्याप जाहीरनाम्याला अंतिम स्वरुप देण्यात आलेले नसून जनसामान्यांमधूनच मुद्दे संकलित करण्यात येणार आहे.
नागपूर: लोकसभा निवडणूकांसाठी भाजपकडून प्रचाराला सुरुवात झाली असली तरी यंदाच्या जाहीरनाम्यात काय मुद्दे असणार याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. भाजपकडून अद्याप जाहीरनाम्याला अंतिम स्वरुप देण्यात आलेले नसून जनसामान्यांमधूनच मुद्दे संकलित करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या असून अगदी सोशल मीडियावरदेखील लोक आपले मुद्दे मांडू शकणार आहेत.
भाजपचे नागपूर लोकसभा निवडणूक प्रमुख आ.प्रवीण दटके यांनी मंगळवारी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली. मागील १० वर्षांत भाजप सरकारने मतदारांना पूर्ण होतील अशीच आश्वासने जाहीरनाम्यातून दिली होती. जनतेला आता नेमक्या काय अपेक्षा आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेण्यात येणार आहे. अगदी केंद्रपातळीपासून ते राज्यस्तरीय, विदर्भस्तरीय व नागपूर लोकसभा मतदारसंघनिहाय जनतेच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन सूचना देण्याची सुविधा आहेच. सोबतच भाजपचे धंतोलीतील विदर्भ विभागीय कार्यालय व गणेशपेठेतील महानगर कार्यालयातदेखील सूचनापेट्या लावण्यात आल्या आहेत, असे दटके यांनी सांगितले. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी स्थानिक पातळीवरील संकल्पपत्रदेखील जारी करण्यात येणार आहे. यावेळी महानगर अध्यक्ष बंटी कुकडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मोहन मते, धर्मपाल मेश्राम, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.