दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांना भाजप देणार नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:06 AM2019-01-08T01:06:45+5:302019-01-08T01:09:03+5:30
राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला दांडी मारणे भाजपाच्या अनेक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना महागात पडणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अनेक पदाधिकारी व नगरसेवक अनुपस्थित होते. यासंदर्भात राष्ट्रीय सह संघटनमंत्री व्ही.सतीश यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या नगरसेवकांना पक्षातर्फे नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला दांडी मारणे भाजपाच्या अनेक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना महागात पडणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अनेक पदाधिकारी व नगरसेवक अनुपस्थित होते. यासंदर्भात राष्ट्रीय सह संघटनमंत्री व्ही.सतीश यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या नगरसेवकांना पक्षातर्फे नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांवर त्यांनी काय काम केले, याचा आढावा घेण्यात येत होता. या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, आमदार अनिल सोले, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार लखन मलिक, महापौर नंदा जिचकार, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पार्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या नेत्यांच्या उपस्थितीत मंचावरून जबाबदारी दिलेल्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलाविण्यात येत होते. परंतु बहुतांश पदाधिकारी गैरहजर होते. त्यानंतर विविध आघाड्यांचे प्रमुख, प्रभागांचे अध्यक्षांना हात वर करण्यास सांगण्यात आले. परंतु फक्त सहा ते सात जणांनी हात वर केले. यामुळे नाराज झालेल्या व्ही. सतीश यांनी बैठकीला गैरहजर असलेल्यांचा समाचार घेण्याचे फर्मानच सोडले. पदाधिकाऱ्यांकडे अधिवेशन व सभेची जबाबदारी आहे. ते अनुपस्थित असेल तर त्याची त्वरित चौकशी व्हायला हवी, असे ते म्हणाले. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनीदेखील ही बाब गंभीरतेने घेतली. ही बैठक अतिशय ‘शॉर्ट नोटीस’वर आयोजित करण्यात आली होती. मात्र सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांपर्यंत निरोप गेले होते. त्यांनी येणे अपेक्षित होते. ते का आले नाही, याची विचारणा करण्यात येईल व नोटीस देऊन त्यांना बोलविण्यात येईल, असे कोहळे यांनी स्पष्ट केले. २० जानेवारी रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कस्तूरचंद पार्क मैदानावर सभा होणार आहे.
घराघरापर्यंत जाण्याचे निर्देश
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अमित शहांच्या होणाºया सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेची तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी घराघरापर्यंत जावे, असे निर्देश व्ही.सतीश यांनी दिले.