'गट'बाजीत अडकली निवड; आठवडा लोटूनही भाजपचा गटनेता ठरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 10:18 AM2021-11-02T10:18:21+5:302021-11-02T14:59:23+5:30
भाजपच्या बैठका झाल्या, सदस्यांकडून गट नेतेपदासाठी नावे मागविण्यात आली, त्या नावावर चर्चा झाली, मात्र त्यातून कुणाचेही नाव निश्चित करण्यात आले नाही. पण, गटनेते निवडीवरून भाजपमध्ये गटबाजी सुरू असल्याची कुजबूज मात्र सुरू झाली आहे.
नागपूर : काँग्रेसने गटनेत्याची नियुक्तीकरून आठवडाभराचा कालावधी झाला. भाजपाला अजूनही गटनेता गवसला नाही. गटनेत्या निवडीसंदर्भात भाजपाने बैठका घेतल्या, सदस्यांची मतेही जाणून घेतली. पण गटनेता काही निश्चित होऊ शकला नाही. त्यामुळे भाजपाच्या गटनेत्याची निवड पक्षांतर्गत गटबाजीत अडकल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.
जिल्हा परिषदेत ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाच्या गटनेत्याचेही सदस्यत्व रद्द झाले होते. पोटनिवडणुका पार पडल्या. पण तीनही पक्षाचे जुने गटनेते पुन्हा जिल्हा परिषदेत आले नाही. पोटनिवडणुकीनंतर उपाध्यक्षाच्या निवडीसाठी प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केल्याने सुरुवातीला राजकीय घडामोडींना वेग आला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी ही निवडणूक स्थगित केली. त्यामुळे राजकीय घडामोडी थंडावल्या. मात्र, काँग्रेसने आपला गट नेता जाहीर केला.
विशेष म्हणजे एकदाच बैठक घेतल्यानंतर गट नेतेपदी अवंतिका लेकुरवाळे यांची निवड केली. उलट भाजप पक्ष नेत्यांच्या दोन -चार बैठका झाल्या. सर्व सदस्यांचे मते जाणून घेतील. पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले गटनेत्याची निवड केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहे. पण गडकरींकडूनही गटनेता निश्चित झाला नाही. गटनेतेपदासाठी व्यंकट कारेमोरे, आतिष उमरे व कैलास बरबटे यांच्या नावाची चर्चा आहे.
गटनेते निवडीवरून भाजपमध्ये गटबाजी सुरू असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. आमदार समीर मेघे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांना त्यांच्या मर्जीतील नेता हवा असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपाच्या अंतर्गत हालचाली मंदावल्याने उपाध्यक्ष पदासाठी १२ नोव्हेंबरला निवडणूक आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच भाजपाच्या गटनेत्याचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.