भाजपाकडून विदर्भवाद्यांचा अपेक्षाभंग, विषबाधितांना पैसे देऊन सरकारने झटकली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 07:26 PM2017-11-11T19:26:35+5:302017-11-11T19:31:20+5:30
केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने वेगळा विदर्भ देण्याची भाषा केली होती. त्यामुळे विदर्भवाद्यांना भाजपाकडून रास्त अपेक्षा होती.
यवतमाळ - केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने वेगळा विदर्भ देण्याची भाषा केली होती. त्यामुळे विदर्भवाद्यांना भाजपाकडून रास्त अपेक्षा होती. परंतु, भाजपाने पूर्ण अपेक्षाभंगच नव्हेतर हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असे सांगणारे देवेंद्र फडणवीस माझ्यावर विदर्भाचीही जबाबदारी आहे, असे ठासून का सांगत नाहीत, असा खणखणीत सवाल माजी महाधिवक्ता आणि विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी केला.
यवतमाळात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाने वेगळ्या विदर्भ राज्याच्या आश्वासनावर जागा जिंकल्या. मात्र, आता त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर दुर्लक्ष केल्याने विदर्भाच्या चळवळीची स्थिती चिंताजनक झाल्याची खंतही अणे यांनी व्यक्त केली. स्वतंत्र राज्यासाठी हिंसक आंदोलन करण्याची गरज पडणे हे राजकीय गुन्हेगारीकरणाचे लक्षण होय. केवळ विदर्भाच्या मुद्द्यावर लढणारा कुठलाही पक्ष नसल्याने आम्ही भाजपाला सहकार्य केले होते.
पण आता विदर्भ राज्य आघाडी २०१९ मध्ये स्वत:च्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने केवळ मोदींच्या लाटेत विदर्भ जिंकला नाही. तर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या नावाने मते मागितली म्हणून विजय मिळवता आला. मात्र आता पक्षात फक्त मोदी उरलेत. गडकरी, फडणवीस यांना पक्षात स्थान नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाच्या जागा नक्कीच कमी होणार आहेत. त्या जागा काँग्रेसलाही मिळणार नाहीत. तर विदर्भासाठी झगडणाºया पक्षालाच मिळतील, असा आशावाद अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला अॅड. सुरेंद्र पारधी, निरज खांदेवाले, वासूदेव विधाते, बालाजी येरावार, अॅड. अमोल बोरखडे, अनिल जवादे, संदीप तेलंग, जितेंद्र हिंगासपुरे, अमोल कठाणे आदी उपस्थित होते.
विदर्भाच्या माणसाचे सरकारला मोल नाही
यवतमाळमध्ये कीटकनाशकातून विषबाधा झाल्याने २२ जणांचा मृत्यू झाला. याची मुख्य जबाबदारी सरकारचीच आहे. मात्र, सरकार केवळ पैसे देऊन जबाबदारी झटकत आहे. मुंबईत समुद्रात वादळ असेल तर मच्छिमारांना धोक्याचा इशारा दिला जातो. मात्र विदर्भात फवारणी करताना शेतकºयांना कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नाही आणि आताही ते देण्याबाबत सरकार तोंड उघडायला तयार नाही, असा आरोप अणे यांनी केला. मृतांच्या नातेवाईकांना मोबदला देऊन सरकार जबाबदारी झटकत आहे. या प्रकरणातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोरण म्हणून काहीही जाहीर करण्यात आले नाही. ‘रडतात साले’ म्हणणा-यांकडून शेतक-यांनी अपेक्षा तरी का करावी? सरकार संवेदनाहीन असून विदर्भाच्या माणसाचे सरकार दरबारी मोल नाही, अशीही टीका त्यांनी केली.