भाजपने लोकशाहीचा अपमान केला, पटोलेंचे आरोप; कोल्ह्याला द्राक्षे आंबट, फडणवीसांचे प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 07:05 PM2021-12-14T19:05:37+5:302021-12-14T19:06:27+5:30
Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे दिसून आले.
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भाजपने घोडेबाजार करून लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला, तर कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात व अस्वस्थतेतून काँग्रेस आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
निकालानंतर शहरात असलेल्या पटोले यांनी आपली भूमिका मांडली. भाजपने निवडणुकीत घोडेबाजार केला. त्यांचा आपल्याच मतदारांवर विश्वास नव्हता, म्हणून त्यांना शहराबाहेर नेले. आपल्याच मतदारांवर विश्वास नसलेला हा पक्ष आहे. भाजपने घोडेबाजार करत लोकशाहीचा अपमान केला आहे. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. वेळेवर उमेदवार बदलल्याचा निकालावर काहीही फरक पडलेला नाही. भाजपतर्फे विविध दावे करण्यात येत आहेत. त्यावर आता भाष्य न करता भविष्यात उत्तर देऊ, असे नाना पटोले म्हणाले.
बावनकुळेंचे ‘नेव्हर गो बॅक’वाले ‘कमबॅक’
महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्रित येऊन सहज निवडणूक का जिंकू शकतात हा समज आम्ही मोडीत काढला आहे. राज्यात भाजपच्या विजयाची मालिका सुरू होत आहे. बावनकुळे यांना दोन वर्षे पक्षात ‘गॅप’ मिळाला नव्हता, तर तो ‘लेजिस्लेटिव्ह गॅप’ होता. आता बावनकुळे यांचे जे ‘कमबॅक’ झाले आहे ते ‘नेव्हर गो बॅक’वाले ठरेल. पटोले यांनी भाजपवर पराभवाच्या अस्वस्थतेतून आरोप केले आहेत. कोल्ह्याला द्राक्षे आंबटच लागतात. हिंदीत एक म्हण आहे की, ‘खिसियानी बिल्ली खंबा नोचे.’ तसाच काहीसा हा प्रकार आहे, असा चिमटा फडणवीस यांनी काढला.