महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन का बोलविले नाही ? चित्रा वाघ यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 10:22 AM2022-03-08T10:22:25+5:302022-03-08T18:37:39+5:30
जर महाविकास आघाडी शासनाला महिला सुरक्षेची काळजी आहे तर मग विशेष अधिवेशन का बोलविले नाही, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मंगळवारी त्या पत्रपरिषदेदरम्यान बोलत होत्या.
नागपूर : राज्य शासनाकडून महिला सुरक्षेचे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्थिती नेमकी विपरीत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष अधिवेशनाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी नाकारली. जर महाविकास आघाडी शासनाला महिला सुरक्षेची काळजी आहे तर मग विशेष अधिवेशन का बोलविले नाही, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मंगळवारी त्या पत्रपरिषदेदरम्यान बोलत होत्या.
राज्यात गुन्हेगारांना संरक्षण आहे. मात्र महिलांना सुरक्षा नाही. संजय राठोड प्रकरणाला दोन वर्षे झाली. पण अद्यापही साधा एफआयआर दाखल झालेला नाही. औरंगाबाद येथील सेनेच्या आमदारावर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हायला हवा होता. सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचं काम पोलिसांकडून होत आहे. मुख्यमंत्री हे कोरोना कालावधीत घरात होते व आशा वर्कर्स जीव धोक्यात घालून काम करत होत्या. त्यांच्या भरवशावर मुख्यमंत्र्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांचा पुरस्कार मिळाला. मात्र त्याच आशा वर्कर्सला हक्काच्या मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यात महिलांचा आवाज दाबायचं काम होत आहे, असा आरोप वाघ यांनी केला.
गुलाबराव पाटीलांकडून महिलांचा अपमान
गुलाबराव पाटील राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी हेमा मालिनी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे होते. परंतु त्यांनी माफी मागितली व मुख्यमंत्र्यांनी त्यांना माफदेखील केले. यातूनच सरकार महिलांच्या हक्कांबाबत किती जागरूक आहे हे दिसून येत आहे, अशी टीका वाघ यांनी केली.