-तर भाजप नेत्यांनी १० मुले जन्माला घालावी

By admin | Published: December 27, 2016 02:49 AM2016-12-27T02:49:39+5:302016-12-27T02:49:39+5:30

महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदी ताप आहे तसाच आहे. बेरोजगारीचा ग्राफ वाढतो आहे.

-The BJP leaders should have born 10 children | -तर भाजप नेत्यांनी १० मुले जन्माला घालावी

-तर भाजप नेत्यांनी १० मुले जन्माला घालावी

Next

स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद
ही कोणती धर्म संस्कृती ? विविध क्षेत्रातील महिलांचा सवाल
महिलांना मशीन समजू नका
महागाई, गरिबीने सर्वसामान्य त्रस्त

नागपूर : महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदी ताप आहे तसाच आहे. बेरोजगारीचा ग्राफ वाढतो आहे. देशात आजही अनेक नागरिक दोनवेळच्या जेवणापासून वंचित आहेत, असे असताना केवळ हिंदूची संख्या कमी होत आहे, असा तर्क लावत हिंदूनी किमान १० मुले जन्माला घालावी, असे फर्मान सोडणारे ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वक्तव्यावर उपराजधानीतील विविध क्षेत्रातील महिलांनी जोरदार टीका केली. धर्म आणि संस्कृतीच्या नावावर शंकराचार्यांनी केलेले वक्तव्य कोणत्या संस्कृतीत मोडणारे आहे, असा सवाल महिलांनी केला. धर्मसंस्कृती महाकुंभाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संघपरिवार आणि भाजप नेत्यांनी १० मुले जन्माला घालत शंकराचार्यांच्या उपदेशाची आधी स्वत: अंमलबजावणी करावी, अशी उपरोधिक टीका नागपूरकर महिलांनी केली आहे. महिलांना मुले तयार करणारी मशीन समजण्याचा हा संकुचित दृष्टिकोन असल्याचे मत काहींनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

अगोदर संघाच्या स्वयंसेवकांचे लग्न लावा
महिलांना १० मुले जन्माला घाला म्हणण्यापूर्वी अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे लग्न लावा आणि त्यांच्यावरच हा प्रयोग करा. महिला म्हणजे मशीन वाटते का? एखाद्या शंकराचार्याने असे वक्तव्य करणे म्हणजे वयानुसार त्या शंकराचार्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असे दिसून येते. असे आदेश देणारे हे होतात कोण? हा देश कुणी हिटलर चालवत नाही याची जाणीव असायला हवी. यानंतरही १० मुले जन्माला घालावी असे वाटत असेल तर त्याची सुरुवात स्वत:च्या घरातून करा. या युगात असे बोलणे म्हणजे महिलांचा अपमान करणे होय. ही धर्मांधता असून या धर्मांधतेने कळस गाठला आहे, त्यामुळे याचा आणि त्या शंकराचार्याचा निषेध असो.
- रूपाताई कुळकर्णी, अध्यक्ष, विदर्भ मोलकरीण संघटना

स्वत:च्या घरातून सुरुवात करा
महिलांना वस्तू म्हणून समजणे हे चुकीचे आहे. घटनेने आम्हाला जे अधिकार दिले आहेत, त्यात मग लग्न करण्याचा किंवा न करण्याचा, मुले जन्माला घालण्याचा असो की न घालण्याचा असो ते मीच ठरवणार. धर्माच्या नावावर कुणी महिलांना मशीन समजण्याची गरज नाही. इतकेच मुले जन्माला घाला असा उपदेश देणे म्हणजे संकुचित दृष्टिकोन लक्षात घेता अशा लोकांना जी मंडळी गुरू समजतात त्यांचीही केविलवाणी स्थिती आहे लोकांना उपदेश द्यायचाच असेल तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वत:च्या घरातूनच झाली पाहिजे. त्यांनीसुद्धा आपल्या महिलांपासून याची सुरुवात करावी, आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्हाला काय हवे आहे ते आम्ही ठरवू.
- अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, विश्लेषक, मानवी हक्क

महागाईच्या काळात शक्यच नाही
दहा मुले जन्माला घालणे हे आजच्या महागाईच्या काळात शक्य नाही आणि योग्यही होणार नाही. परंतु एकच मुलगा असावा, असा विचारही योग्य नाही. किमान दोन मुले असावी त्यापैकी एक देशासाठी देता येईल, या उद्देशातून शंकराचार्य यांनी कदाचित ते वक्तव्य केले असावे.
- अर्चना डेहनकर, महासचिव, महाराष्ट्र महिला मोर्चा (भाजप)

Web Title: -The BJP leaders should have born 10 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.