भाजपचे नेते एक दिवस देशाचेदेखील नाव बदलतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:07 AM2021-03-23T04:07:49+5:302021-03-23T04:07:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्याचे मतदान काही दिवसांवर आले असताना राजकारण आणखी तापले आहे. भाजप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्याचे मतदान काही दिवसांवर आले असताना राजकारण आणखी तापले आहे. भाजप हा आयारामांचा पक्ष असून दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांना राजकारणात आणले जात आहे. नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षाही मोठा असल्याचा विचार करायला ते भाग पाडू शकतात. गुजरातमधील क्रिकेट मैदानाला मोदी यांचे नाव दिले आहे. एक दिवस हे लोक देशाचेदेखील नाव बदलतील, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली. बांकुरा जिल्ह्यातील कोतुलपूर येथील प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.
भाजपच्या जाहीरनाम्यावरदेखील ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला आहे. भाजपचा जाहीरनामा हा जनतेची दिशाभूल करणारा असून मोफत रेशनबाबत तर खोटारडे आश्वासन देण्यात आले असल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला. भाजपचे गुंडे लोकांच्या घरी जाऊन मत मागत आहेत. जर अशा लोकांनी तुम्हाला धमकी दिली तर त्यांना हुसकावून लावण्यासाठी घरातील भांडे तयार ठेवा, असे बॅनर्जी यांनी सांगितले. भाजपचे नेते महिलांनी काय कपडे घालावेत याबाबत बंधने लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक कंपन्या ते खाजगी कंपन्यांना विकत आहेत, असा आरोप त्यांनी लावला.