गृहमंत्र्यांच्या घरावर भाजयुमोचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:08 AM2020-12-31T04:08:56+5:302020-12-31T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : औरंगाबाद येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औरंगाबाद येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन्स येथील घरावर बुधवारी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अन्यथा राजीनामा देण्यास सिद्ध व्हा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
औरंगाबाद येथील एक तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे नाव पुढे आले आहे. मात्र, त्याच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यातच अल्पसंख्य आघाडीच्या एका नेत्याने महिलांबाबत अभद्रता पसरविणारे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित केले होते. या प्रकरणावर गृहमंत्री गप्प का आहेत, असा सवाल यावेळी भाजयुमाेच्या कार्यकर्त्यांनी केला. राज्याचे गृहमंत्री महिला अत्याचाराविरोधात बाता खूप करतात. मात्र, आपल्याच पक्षाच्या नेत्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी कारवाईसाठी पुढाकार घ्यावा अन्यथा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गृहमंत्र्यांच्या घरावर मोर्चा धडकणार म्हणून पोलिसांनी आधीच घराला सुरक्षेचा घेरा दिला होता. यावेळी प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.आंदोलनात भाजयुमोचे शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, कल्याण देशपांडे, राहुल खंगार, साचिन करारे, आलोक पांडे, दिपांशु लिंगायत, अमर धरमारे, वैभव चौधरी, यश सातपुते, पुष्कर पोरशेट्टीवार, जय साजवानी, राकेश भोयर, सन्नी राऊत, मनमीत पिल्लारे आदींनी भाग घेतला.