पुढील ५५ दिवस महत्त्वाचे, त्यानंतर राज्यात ‘निवडणूक’ यात्रा

By योगेश पांडे | Published: December 14, 2023 11:53 PM2023-12-14T23:53:30+5:302023-12-14T23:56:35+5:30

प्रत्येक भाजप आमदाराला सादर करावा लागणार कामाचा लेखाजोखा , ‘नमो ॲप’साठी आमदारांना ‘टार्गेट’

bjp members meeting in nagpur said next 55 days are important and after that the election yatra in the state | पुढील ५५ दिवस महत्त्वाचे, त्यानंतर राज्यात ‘निवडणूक’ यात्रा

पुढील ५५ दिवस महत्त्वाचे, त्यानंतर राज्यात ‘निवडणूक’ यात्रा

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : लोकसभानिवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना भाजपकडून संघटन मजबुतीवर भर देण्यात येत आहे. याअंतर्गतच गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी जास्त महिने राहिलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने पुढील ५५ दिवस आमदारांना व्यापक जनसंपर्क करण्याची सूचना केली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात राज्यात पक्षातर्फे ‘निवडणूक’ यात्रा काढण्यात येईल, असे सांगत निवडणूकांचे घोडामैदान जवळच आहे, असे संकेतच दिले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे भाजप अध्यक्ष आशीष शेलार प्रामुख्याने उपस्थित होते. तीन राज्याच्या विधानसभा निवडणूका जिंकल्यामुळे पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत जनतेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पक्षाची तसेच शासनाची ध्येयधोरणे पोहोचणे आवश्यक आहे. आचारसंहिता कधी लागेल ते आपल्या हातात नाही. मात्र हाती असलेला वेळ नियोजनपद्ध संपर्क करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पक्षाकडून प्रत्येक आमदाराला त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण मागण्यात आले आहे. पक्षाकडे ते सादर करायचे आहे. ही बाब गंभीरतेने घेण्यास सांगण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात राज्यात भाजपकडून यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जाईल. त्याच्या नियोजनाबाबतदेखील माहिती देण्यात आली.

- अनेक आमदार अनुपस्थित, पक्षाकडून कडक इशारा

दरम्यान गुरुवारच्या बैठकीला अनेक आमदार अनुपस्थित होते. याअगोदरच्या व्हर्चुअल बैठकांनादेखील अनेक आमदारांनी दांडी मारली होती. त्याप्रमाणे पक्षाच्या विविध ठिकाणच्या बैठकांमध्ये असेच चित्र दिसून आले. अगदी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीलादेखील काही जण अनुपस्थित होते. काही आमदार बैठकांना गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत नसल्याचे म्हणत पक्षनेतृत्वाने वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच देत कानपिचक्या दिल्या.

- दररोज ‘नमो ॲप’साठी पाच मिनिटे तरी द्या

यावेळी नमो ॲपबाबत प्रदेशाध्यक्षांनी आमदारांना सूचना केल्या. २५ जानेवारी पर्यंत राज्यात ५० लाख नमो ॲप डाऊनलोड करायचे आहे. प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघात कमीत कमी ३० हजार ॲप डाऊनलोड करवून घ्यायचे आहेत. तसेच स्वत: आमदारांनीदेखील ते ॲप वापरले पाहिजे. रोज सकाळी किमान पाच मिनिटे नमो ॲपवर घालवावे, असे निर्देशच देण्यात आले.

- बुथप्रमुखांसमोर ५१ टक्के मतांचे टार्गेट

भाजपने राज्यभर बुथप्रमुखांचे जाळे विणले आहे. बहुतांश बुथवर भाजपतर्फे नेमणूका झाल्या आहेत. प्रत्येक बुथप्रमुखाला किमान ५१ टक्के मते भाजपला कसे मिळतील याचे नियोजन करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील कमीत कमी दीडशे प्रभावी बूथप्रमुख तयार करण्यास सांगण्यात आले.

Web Title: bjp members meeting in nagpur said next 55 days are important and after that the election yatra in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.