भाजपा आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा, काँग्रेसचा झेंडा घेणार हाती!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 02:03 PM2018-10-02T14:03:03+5:302018-10-02T15:14:11+5:30
भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे.
नागपूर - गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर उघडपणे टीका करणारे भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव असून वडिलांप्रमाणेच ते काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता आहे.
#Maharashtra: BJP MLA from Katol Dr Ashish Deshmukh submits his resignation to the Speaker of the Maharashtra Legislative Assembly.
— ANI (@ANI) October 2, 2018
राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आशिष देशमुख वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाकडे निघालेत. तिथेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सत्य बोलणं म्हणजे बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे. मुख्यमंत्र्यांवरचा माझा विश्वास उडाला आहे, त्यामुळे योग्य वेळ येताच मी आमदारकीचा राजीनामा देईन, असा आक्रमक पवित्रा आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी घेतला होता. राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनही केलं होतं. त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरू होती. अखेर आज, गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्षांना पाठवला.