भाजप आमदारांची कसोटी

By admin | Published: February 16, 2017 02:14 AM2017-02-16T02:14:52+5:302017-02-16T02:14:52+5:30

निवडणूक महापालिकेची असली तरी उमेदवारांसोबतच भाजपच्या आमदारांचीही कसोटी लागणार आहे.

BJP MLA's Test | भाजप आमदारांची कसोटी

भाजप आमदारांची कसोटी

Next

कमी जागा आल्यास संकट फडणवीस, गडकरींचे संकेत ‘मिशन १२५’ चे आवाहन
नागपूर : निवडणूक महापालिकेची असली तरी उमेदवारांसोबतच भाजपच्या आमदारांचीही कसोटी लागणार आहे. मर्जीतील उमेदवारांना तिकीट देण्यासाठी नेत्यांकडे आग्रह धरणाऱ्या आमदारांची आता आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी कसोटी लागणार आहे. अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्या व त्यामुळे भाजपला ‘मिशन १२५’ गाठता आले नाही तर संबंधित आमदारांचे विधानसभेचे तिकीट संकटात येण्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने तब्बल २४ नगरसेवकांचे तिकीट कापले. याशिवाय बऱ्याच दिग्गज पदाधिकाऱ्यांना तिकीट नाकारण्यात आले. भाजपच्या तिकीट वाटपात आमदारांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती, अशी माहिती समोर आली आहे.
काही आमदारांनी पक्षाने केलेल्या सर्वेक्षणाच्या विरोधात जाऊन आपल्या समर्थकाला उमेदवारी मिळवून दिली. संबंधिताला आपण निवडून आणूच, असा शब्द फडणवीस, गडकरींना दिला. काही ठिकाणी उमेदवारांना कार्यकर्त्यांमधून विरोध झाला. मात्र, आमदारांनी संबंधित उमेदवाराची बाजू घेऊन हाच सक्षम असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे नेत्यांनीही आमदारांच्या पसंतीला प्राधान्य दिले. गडकरी, फडणवीस यांच्या राज्यभर प्रचार सभा लागल्या आहेत. नागपुरात ते अल्प काळ असतील. त्यामुळे प्रचाराची सर्व धुरा आता आमदारांच्या खांद्यावर आली आहे. अशात आमदारांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले, एखाद्या उमेदवाराबद्दलच्या नाराजीतून दुर्लक्ष केले व त्याचा परिणाम निकालावर झाला तर संबंधित आमदाराच्या रिपोर्टकार्डवर लाल फुली मारली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेत्यांनी आमदारांकडून किती जागा निवडून येतील याची आकडेवारी घेतली. आमदारांनी दिलेली आकडेवारी काहीशी फुगीर होती. त्यावर नेत्यांनी एवढ्या जागा येतील का, असा प्रतिप्रश्न केला असता आमदारांनी ठासून होकार भरला. त्यामुळे आता दिलेला आकडा गाठण्यासाठी आमदारांची कसोटी लागणार आहे.(प्रतिनिधी)

 

Web Title: BJP MLA's Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.