जिंकूनही भाजप संतुष्ट नाही : सर्व बूथ नव्याने बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:22 AM2019-06-11T00:22:29+5:302019-06-11T00:23:08+5:30
लोकसभा निवडणुकीत नागपुरातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख १६ हजार ९ मतांच्या अंतराने जिंकले. तसेच भाजपचे मतदान वाढल्यानंतरही २०१४ च्या तुलनेत विजयाची लीड कमी झाल्याने पक्ष चिंतेत आहे. अशा परिस्थितीत पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेला आणखी मजबूत करण्यासाठी शहरातील प्रत्येक बूथचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपुरातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख १६ हजार ९ मतांच्या अंतराने जिंकले. तसेच भाजपचे मतदान वाढल्यानंतरही २०१४ च्या तुलनेत विजयाची लीड कमी झाल्याने पक्ष चिंतेत आहे. अशा परिस्थितीत पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेला आणखी मजबूत करण्यासाठी शहरातील प्रत्येक बूथचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपुरातून भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. नितीन गडकरी यांना एकूण ६,६०,२२१ मते मिळाली, तर काँग्रेसचे नाना पटोले हे केवळ ४,४४,२१२ मतांपर्यंत मजल मारू शकले. लोकसभेच्या सहापैकी पाच विधानसभा मतदार संघात गडकरी आघाडीवर राहिले. उत्तर नागपुरात पटोले आघाडी घेण्यात यशस्वी राहिले. भाजपने या निवडणुकीसह आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात सोमवारी धंतोली येथील विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत विचारमंथन केले. संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, माजी महापौर प्रवीण दटके, मनपा सत्तापक्ष नेते व शहर महामंत्री संदीप जोशी, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, संघटन मंत्री भोजराज डुंबे आदी उपस्थित होते. आ. कोहळे यांनी बैठकीनंतर सांगितले की, लोकसभा निवडणुकीत संघटन संरचनेंतर्गत विस्तारक, शक्तिप्रमुख, बूथप्रमुख आदींना जबाबदारी सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी लोकसभा निवडणुकीपर्यंत मर्यादित होती. पक्षाने निवडणुकीनंतर शहरातील प्रत्येक बूथवर चिंतन-मनन केले. यानंतर बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व बूथचे नव्याने गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विस्तारक, शक्तिप्रमुखांनाही बदलविण्यात येईल.
भाजप सूत्रानुसार ज्या बूथवर गडकरी यांना अपेक्षेनुसार मते मिळाली नाहीत तेथील पदाधिकाऱ्यांना हटविण्यात येईल. यात त्या बूथचाही समावेश आहे, जिथे गडकरी समोर आहेत, परंतु त्यांना तिथे अपेक्षित मते मिळालेली नाही. सूत्राचा दावा आहे की, पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागाचाही आढावा घेतला जात आहे. अपेक्षित यश न मिळविणाºयांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.