पैशांच्या वादातून भाजप पदाधिकारी सना खानचा घातपात?, नागपूर पोलिसांचे ‘वेट अँड वॉच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 10:37 IST2023-08-10T10:36:42+5:302023-08-10T10:37:50+5:30
भाजप पदाधिकारी सना खान यांचा शोध नाहीच, जबलपूर पोलिसांवरच भिस्त

पैशांच्या वादातून भाजप पदाधिकारी सना खानचा घातपात?, नागपूर पोलिसांचे ‘वेट अँड वॉच’
नागपूर : आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी सना खान यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. नागपूर पोलिसांनी जबलपूरला पाठविलेले तपास पथक परत बोलावले आहे. आता पोलिसांची जबलपूर पोलिसांच्या तपासावरच भिस्त राहणार आहे व तोपर्यंत शहर पोलिसांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दरम्यान, जबलपूर पोलिसांनी या प्रकरणात अद्याप गुन्हादेखील दाखल केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, अमित व सना यांच्यात व्यवसायातील पैशांमधून वाद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
४० वर्षीय महिला पदाधिकारी सना खान या १ ऑगस्टला अमित साहूला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ताच होत्या. अमित साहू हा जबलपूरचा गुन्हेगार आहे. सना यांच्या आईने मानकापूर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. मानकापूर पोलिसांनी तत्काळ जबलपूरला एक पथक पाठवून मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने महिला पदाधिकाऱ्यासह अमित साहू आणि त्याचा भाऊ मनीष यांचा शोध घेतला. तिघांचाही काहीच सुगावा लागलेला नव्हता.
दरम्यान पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौडला अटक केली. त्याने चौकशीदरम्यान अमितची गाडी धुतल्याची कबुली दिली. गाडीत रक्त सांडले होते व त्याच्या सांगण्यावरून गाडी स्वच्छ केल्याची त्याने माहिती दिली. त्यामुळे सना यांच्यासोबत बरेवाईट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र पोलिसांनी यावर ठोस भूमिका मांडलेली नाही. ससंबंधित प्रकरण जबलपूर पोलिसांच्या कार्यकक्षेतील असल्याचे कारण देत नागपूर पोलिसांनी तपास पथक परत बोलावले आहे.
सना खानचा अमितसोबत विवाह?
या प्रकरणात फरार असलेला अमित ऊर्फ पप्पू शाहू या विवाहित असून त्याची पत्नी पोलिस कर्मचारी आहे. अमित व सनादरम्यान प्रेम झाले व त्यांचे एप्रिल महिन्यात लग्न झाल्याची माहिती जबलपूर पोलिसांना मिळाली आहे. पोलिस त्यांच्या लग्नाचे प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा करत आहेत. दोघे व्यवसायातदेखील पार्टनर होते व पैशांच्या प्रकरणातून दोघांत वाद झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणातील ट्विस्ट आणखी वाढला आहे.
गृहमंत्र्यांना पत्र, सखोल तपासाची मागणी
दरम्यान, नागपूर पोलिसांच्या हाती काहीच ठोस लागलेले नाही व जबलपूर पोलिसांकडून गंभीरतेने पावले उचलण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री जुनेद खान यांनी केली आहे.