भाजपा पदाधिकाऱ्याचे नागपुरात महिला पोलिसासोबत लज्जास्पद वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:15 AM2018-12-04T10:15:31+5:302018-12-04T10:28:01+5:30

नागपूर येथे कार्यक्रमस्थळी कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत एका भाजपा पदाधिकाऱ्याने लज्जास्पद वर्तन केले.

BJP office bearer's shameful behavior with women police in Nagpur | भाजपा पदाधिकाऱ्याचे नागपुरात महिला पोलिसासोबत लज्जास्पद वर्तन

भाजपा पदाधिकाऱ्याचे नागपुरात महिला पोलिसासोबत लज्जास्पद वर्तन

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल होऊ नये यासाठी राजकीय दबावपोलिसांमध्ये संतापाची लाट

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कार्यक्रमस्थळी कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत एका भाजपा पदाधिकाऱ्याने लज्जास्पद वर्तन केले. जरीपटक्यातील सिंधू मैदानात सोमवारी रात्री सुरू असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान ही प्रचंड खळबळजनक घटना घडली. महिला पोलिसांनी त्याचा ताबडतोब उत्तर देऊन संबंधित पदाधिकाऱ्याला जागेवरच इंगा दाखविला. हे वृत्त वायुवेगाने पसरल्याने पोलीस दलात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यावर प्रचंड दबाव आणला गेल्याने रात्री ११ वाजेपर्यंत जरीपटका पोलीस ठाण्यात गरमागरम वातावरण होते.

सिंधी बांधवांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे तसेच नागरिकत्व बहाल करण्याचा कार्यक्रम सोमवारी रात्री जरीपटक्यात सिंधू मैदानात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी पार पाडत होते. मुख्य पाहुणे कार्यक्रमस्थळी आले असल्याने तिकडे स्वागतासाठी धावपळ सुरू असतानाच झोपडपट्टी सेलच्या पदाधिकाऱ्याने दूर उभी असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाजवळ जाऊन लज्जास्पद कृती केली. या अनपेक्षित प्रकारामुळे महिला पोलीस अधिकारी आणि आजूबाजूच्या महिला पोलीस चक्रावल्या. त्यांनी पदाधिकाऱ्यांची कानशेकणी केली.

दरम्यान, काहीतरी गोंधळ झाल्याचे लक्षात आल्याने बाजूची मंडळी धावली. पोलिसही धावले. त्यांनी त्या पदाधिकाऱ्याला बाजूला घेतले. वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार गेल्याने त्यांनी कार्यक्रम संपताच पीडित महिला पोलीस अधिकारी आणि पदाधिकाऱ्याला जरीपटका ठाण्यात नेले. त्याची माहिती कळताच लज्जास्पद वर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे सहकारी मोठ्या संख्येत पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी पीडित महिला अधिकाऱ्याचे चक्क पाय पकडण्याची तयारी दाखविली. तक्रार देऊ नका, अशी सारखी विनवणी करण्यात येत असल्याने तसेच भविष्यात कारवाईमुळे नोकरीत अडथळे येऊ शकते, असा धाक दाखवला गेल्याने रात्री ११.२५ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करायचा की नाही, याबाबत चर्चा सुरू होती.

होय, प्रकरण लज्जास्पद. मात्र...!

यासंबंधाने जरीपटक्यातील अधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लोकमत प्रतिनिधीने चर्चा करून प्रकरणाची खातरजमा करून घेतली. अनेकांनी प्रकरण घडले. अत्यंत लज्जास्पद आहे, असे सांगतानाच आपल्या नावाचा उल्लेख कुठे होऊ नये, अशीही अट घातली.

‘तो’वादग्रस्तच

सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत लज्जास्पद कृती करणारा हा भाजपा पदाधिकारी वादग्रस्तच असल्याचे बोलले जाते. तो ‘वाईन शॉप’ संचालित करतो, अशीही माहिती असून, त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे जरीपटका पोलिसांनी सांगितले.

Web Title: BJP office bearer's shameful behavior with women police in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.