भाजपा पदाधिकारी ढेंगरेच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशात अटक; पाचगाव येथील ढाब्यावर केली होती हत्या

By जितेंद्र ढवळे | Published: November 14, 2023 07:32 PM2023-11-14T19:32:13+5:302023-11-14T19:32:27+5:30

विशेषकुमार रामदास रघुवंशी (३३, रा. कोडवन, मंडला, मध्य प्रदेश) व आदी चंद्रामनी नायक (३०, रा. बनपल्ली, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.

BJP official Dhengre's killers arrested in Madhya Pradesh murder was done at a dhaba in Pachgaon | भाजपा पदाधिकारी ढेंगरेच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशात अटक; पाचगाव येथील ढाब्यावर केली होती हत्या

भाजपा पदाधिकारी ढेंगरेच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशात अटक; पाचगाव येथील ढाब्यावर केली होती हत्या

उमरेड (नागपूर) : उमरेड तालुका भाजपाचे महामंत्री आणि पाचगाव येथील राजू ढाब्याचे मालक राजू भाऊराव ढेंगरे (४८, रा. उंद्री, ता. उमरेड) यांच्या हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने दाेन्ही आराेपींना मंडला (मध्य प्रदेश) येथून साेमवारी (दि. १३) रात्री अटक केली. दाेघेही ढेंगरे यांच्या ढाब्यावर काम करायचे.

विशेषकुमार रामदास रघुवंशी (३३, रा. कोडवन, मंडला, मध्य प्रदेश) व आदी चंद्रामनी नायक (३०, रा. बनपल्ली, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. काम केल्यानंतरही मालकाने कामाचे पैसे न दिल्याने त्यांचा खून केल्याची कबुली दाेघांनी दिली, अशी माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. राजू ढेंगरे यांच्याकडे विशेषकुमार हा पाेळ्या तयार करण्याचे तर आदी वेटर म्हणून काम करायचा. ढेेंगरे हे शनिवारी (दि. ११) रात्री त्यांच्याकडे काम करणाऱ्या जामकर नामक महिलेला तिच्या घरी साेडून परत आले. त्यानंतर विशेषकुमार व आदीने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. याच कारणावरून त्यांच्यात वादही झाला. ढेंगरे खाटेवर झाेपले असताना दाेघांनी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास सराटा व लाकडी दांड्याने त्यांच्या डाेक्यावर जबर वार केले. त्यांचा मृत्यू हाेताच दाेन्ही आराेपींनी ढेंगरे यांच्याच कारने पाचगाव येथून नागपूरच्या दिशेने पळ काढला हाेता.

याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंविचे ३०२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला हाेता. समांतर तपासादरम्यान ‘एलसीबी’ने सीसीटीव्ही फुटेज व आराेपींचे माेबाइल फाेन लाेकेशनच्या आधारे साेमवारी (१२) मंडला गाठले. दाेघेही विशेषकुमारच्या घरी आढळून येताच रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांना अटक केली. मंगळवारी (दि. १४) पहाटे ५ वाजताच्या सुमारास कुही पाेलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा तपास सहायक पोलिस अधीक्षक आशित कांबळे करीत आहेत. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार व आशिषसिंग ठाकूर, उपनिरीक्षक आशिष मोरखडे व बट्टूलाल पांडे यांच्या पथकाने केली.
 
दिवाळीसाठी पैशाची मागणी
आराेपी विशेषकुमार व आदी या दाेघांनाही दिवाळीसाठी त्यांच्या मूळ गावी जायचे हाेते. दाेघांचेही ढेंगरे यांच्याकडे कामाचे प्रत्येकी सहा हजार रुपये असल्याने पैशाची मागणी केली हाेती. राजू यांनी दाेन-तीन दिवसांनी पैसे देताे, अशी बतावणीही केली. परंतु, दाेघांनाही ते मान्य नव्हते. याच वादातून दाेघांनी राजू ढेंगरे यांची हत्या केली.

आधी कार, नंतर ऑटाेने गाठले नागपूर
दाेन्ही आराेपी लगेच मृत ढेंगरे यांच्या कारने नागपूरच्या दिशेने निघाले. दरम्यान, विहीरगावजवळ त्यांची कार उलटल्याने त्यांनी तिथून काही दूर पायी येत ऑटाे किरायाने घेतला. मध्यरात्री नागपूर शहरातील एमपी बसस्टॅण्ड गाठले. तिथून दाेघेही बसने मंडलाकडे निघाले. अपघातामुळे दाेघांच्याही नाक व चेहऱ्याला जखमा आहेत.

जखमी आरोपींवर उपचार
ढेंगरे हत्याकांडातील आरोपी विशेषकुमार आणि आदी याचा अपघात झाल्याने दोघेही जखमी झाले होते. त्यांना सोमवारी रात्री ताब्यात घेतल्यानंतर पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना कुही पोलिसांच्या स्वाधीन केल्या गेले. कुही पोलिसांनी नागपूर मेडीकलमध्ये दोन्ही आरोपींना भरती केले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Web Title: BJP official Dhengre's killers arrested in Madhya Pradesh murder was done at a dhaba in Pachgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.