महाविकास आघाडीच्या सभेत भाजपचा खोडा, मैदान देण्यास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 02:05 PM2023-04-06T14:05:03+5:302023-04-06T14:05:53+5:30
आ. खोपडे, डिकोंडवार यांचा नासुप्र सभापतींकडे अर्ज
नागपूर :महाविकास आघाडीच्या १६ एप्रिल रोजी आयोजित सभेसाठी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनीचे मैदान देण्यास भाजपने विरोध केला आहे. हे मैदान खेळासाठी राखीव असल्यामुळे येथे राजकीय सभेसाठी दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे व प्रभाग २७चे भाजपचे माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांनी दिले आहे. यामुळे सभेपूर्वीच महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीने १६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता दर्शन कॉलनी मैदानावर ‘वज्रमूठ सभा’ आयोजित केली आहे. या सभेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस - राष्ट्रवादीचे नेतेही येणार आहेत. काँग्रेस नेते आ. सुनील केदार, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभेसाठी जोरात तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या मैदानावर सभा घेण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने लेखी परवानगी दिली आहे. आता नासुप्रने दिलेल्या परवानगीवर भाजपने आक्षेप घेतला असून, परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.
मैदान खेळण्यासाठी आरक्षित
आ. खोपडे व माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांनी नासुप्र सभापतींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच कोट्यवधी रूपये खर्च करून शहरातील ११३ मैदानांचा विकास केला. त्या अंतर्गत दर्शन कॉलनी मैदानाचाही विकास करण्यात आला आहे. हे मैदान खेळण्यासाठी आरक्षित आहे. नुकतीच येथे राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धा पार पडली. विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होतात. क्रिकेट, व्हालीबॉल खेळायला युवक येतात. येथे राजकीय सभा झाली तर मैदानावर खड्डे खोदले जातील. खेळाडूंचे नुकसान होईल. शिवाय सद्भावनानगर, कवेलू कॉर्टर, श्रीनगर, दर्शन कॉलनी अशा दाट वस्तीच्या आत हे मैदान आहे. येथे सभेला परवानगी दिली, तर लोकांना गर्दीचा, पार्कींगचा त्रास होईल. त्यामुळे कुठल्याही राजकीय कार्यक्रमासाठी हे मैदान दिले जाऊ नये. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेसाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणीही भाजप नेत्यांनी केली आहे.