पावसाळ्यातील निवडणुकांना भाजपचा विरोध; सोमवारी घेणार निवडणूक आयोगाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 07:54 PM2022-07-09T19:54:58+5:302022-07-09T19:55:26+5:30
Nagpur News राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्ट रोजी घेण्याची घोषणा केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी भाजपने पुढे येत याला विरोध दर्शविला आहे.
नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्ट रोजी घेण्याची घोषणा केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी भाजपने पुढे येत याला विरोध दर्शविला आहे.
सध्याची पावसाची परिस्थती बघता निवडणुका आता घेतल्या तर ८० टक्के मतदार हा मतदान केंद्रावर जाऊच शकणार नाही. त्यामुळे या निवडणुका पुढे सप्टेंबरपर्यंत ढकलण्याच्या मागणीसाठी सोमवार, ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात राज्यभरातील भाजप नेते निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहेत.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेत म्हणाले, ऐन पावसाळ्यात निवडणुका घेणे हा एककल्ली निर्णय आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारशी चर्चा न करता हा निर्णय घेतला आहे. आयोगाने अतिवृष्टी, पूर परिस्थिती, ढगफुटी इत्यादी नैसर्गिक संकटांचा विचार न करता ऐन खरीप हंगामात निवडणुका लावल्या आहेत. सर्व शासकीय यंत्रणा निवडणुकांमध्ये व्यस्त झाल्यास नैसर्गिक आपत्ती आल्यास आवश्यक नियोजनाचा प्रश्न उभा राहणार आहे. पूर परिस्थिती, अतिवृष्टी आणि पावसाळ्याचे नियोजन अत्यावश्यक असल्याने या निवडणुका सप्टेंबर २०२२ पर्यंत घेऊ नयेत अशी मागणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला केली.