नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 01:43 PM2022-07-04T13:43:15+5:302022-07-04T15:25:49+5:30

मंगळवारी सकाळी १० वाजता फडणवीसांचे विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळाजवळील हेडगेवार चौकापासून ते धरमपेठेतील त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्कूटर व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

bjp preparing for welcome of devendra fadnavis in nagpur | नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी

नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी

Next
ठळक मुद्देविमानतळापासून धरमपेठपर्यंत रॅली

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मरगळ दूर करून उत्साहात त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताबदल झाल्यानंतर फडणवीस यांचे मंगळवारी प्रथमच नागपुरात आगमन होणार आहे. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते धरमपेठेतील फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात भाजपच्या महानगर पदाधिकाऱ्यांकडून रविवारी दिवसभर नियोजन बैठका सुरू होत्या.

राज्यात सत्ताबदलानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, हा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास होता. प्रत्यक्षात राजकीय खेळींमुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले व फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या छायाचित्राविना विविध ठिकाणी फडणवीस यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’देखील लागले व ‘सोशल मीडिया’वरदेखील फडणवीसांचा राजकीय ‘गेम’ झाल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत होते.

मात्र नाराजी दूर ठेवत त्यांचे जल्लोषात स्वागत व्हायला पाहिजे अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली व त्यादृष्टीने मंगळवारी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता फडणवीसांचे विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळाजवळील हेडगेवार चौकापासून ते धरमपेठेतील त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्कूटर व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती चौक, प्रतापनगर चौक, लक्ष्मीभवन चौक येथे कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. रॅलीत भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी सहभागी होतील, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी यांनी दिली. शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके व माजी महापौर संदीप जोशी यांनी यासंदर्भात रविवारी दिवसभर नियोजनाच्या विविध बैठका घेतल्या.

Web Title: bjp preparing for welcome of devendra fadnavis in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.