‘लेटरबॉम्ब’वरून भाजपची गृहमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:50+5:302021-03-22T04:07:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ची दाहकता नागपुरातदेखील जाणवली. गृहमंत्री अनिल देशमुख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ची दाहकता नागपुरातदेखील जाणवली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला व त्यांच्या घरावरच हल्लाबोल केला. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने गृहमंत्र्यांची बाजू लावून धरत सिंग यांच्याविरोधात आंदोलन केले.
गृहमंत्र्यांनी सचिन वाझेला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे देशमुख यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकारदेखील नाही, असा भाजपच्या नेत्यांचा सूर होता. संविधान चौकात भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. गृहमंत्र्यांना पैशाची कमतरता असल्याने त्यांनी १०० कोटी मागितले. त्यांना पैसे देण्याची आवश्यकता आहे, असे म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी पैसे गोळा केले.
दुसरीकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या नागपुरातील घरासमोर आंदोलन केले. यावेळी गृहमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून धरणे आंदोलन सुरू केले. गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजयुमोचे शहराध्यक्ष पारेंद्र पटले यांनी केली. यावेळी प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, राहुल खंगार प्रामुख्याने उपस्थित होते. पोलिसांनी पंचवीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राष्ट्रवादीकडून भाजपविरोधात संताप
दुसरीकडे राष्ट्रवादीने गृहमंत्र्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. संविधान चौकात एकत्र येत कार्यकर्त्यांनी भाजपवर आरोप लावले व ठिय्या मांडला. परमबीर सिंग यांनी याबाबत आतापर्यंत मौन का साधले होते, असा सवाल यावेळी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी उपस्थित केला.
‘कोरोना’ नियमावलीचा फज्जा
शहरात ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने रविवारीदेखील ‘लॉकडाऊन’चे पालन करणे अनिवार्य होते. अशा स्थितीत आंदोलन झाले आणि आश्चर्याची बाब म्हणजे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांपैकी कुणीही आंदोलनकर्त्यांना रोखले नाही. एकीकडे सोशल मीडियावर लोकांना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे नियमांना तिलांजली देत दाटीवाटीने आंदोलन करायचे असे चित्र दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे अनेकांनी, तर मास्कदेखील घातला नव्हता. त्यांच्यावर पोलीस प्रशासन किंवा मनपा प्रशासनातर्फे कुठलीही कारवाई झाली नाही.