४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपच्या जनसभा; पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2023 08:58 PM2023-06-01T20:58:45+5:302023-06-01T20:59:20+5:30
Nagpur News ४८ लोकसभा मतदारसंघांत आमच्या जनसभा होतील व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ प्रमुखांची रॅली होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ९ वर्षात झालेल्या निर्णयांचा, कामांचा लेखाजोखा भाजपतर्फे जनतेसमोर मांडला जाईल. एक मोठे जनसंपर्क अभियान राबवून या सर्व बाबी आम्ही महाराष्ट्रातील तीन कोटी घरांपर्यंत नेणार आहोत. केंद्रातील ५० पेक्षा अधिक नेते महाराष्ट्रात येतील. ४८ लोकसभा मतदारसंघांत आमच्या जनसभा होतील व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ प्रमुखांची रॅली होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ३० मे ते ३० जून या काळात हे अभियान राबविण्यात येत असून नऊ वर्षांच्या कार्यकाळाची माहिती जनतेसमोर ठेवली जाईल. भाजपचे आमदार, खासदार त्या-त्या जिल्ह्यांत जाऊन माहिती देतील. भाजप महासागर आहे. यामध्ये कितीही लहान, मोठे नेते आले तरीही त्यांच्यासाठी पक्षात जागा आहे. काम करण्यासाठी आमच्याकडे मोठ्या संधी आहेत. ३५ प्रकोष्ट आहेत, ते वेगवेगळ्या स्तरांवर काम करतात. नऊ मोर्चे आहेत. २८८ विधानसभा आम्हाला लढायच्या आहेत. आमच्या पक्षात बाहेरून कुणीही नेते आले, तरी त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे संधी देण्याची व्यवस्था भाजपकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
मी भाजपचीच आहे, पण भाजप कुठं माझा पक्ष आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्ली येथे रासपच्या एका कार्यक्रमात बोलल्या. याबद्दल विचारले असता बावनकुळे म्हणाले, त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आहे. मी त्यांचे पूर्ण भाषण ऐकले. त्यामध्ये त्या असे काहीही म्हणालेल्या नाहीत.
सत्तेत असताना ओबीसींसाठी काय केले ?
- राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना ओबीसींच्या प्रश्नांसाठी काहीच केले नाही. त्यामुळे आता ओबीसीची मते मिळावी म्हणून त्यांना मेळावे घ्यावे लागत आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात ओबीसी मंत्रालय आणि महाज्योती निर्माण झाले. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला. अजित पवार यांनी तर त्या संदर्भातील निधीची फाईल फेकून दिली होती, असे सांगत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर नेम साधला.